
महाराष्ट्राचे राजकारण सध्या अत्यंत वेगळ्या वळणावर आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीवर साऱ्या देशाचे लक्ष आहे. काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी सकाळी पार पडल्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना 4 वाजता बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.
दिल्लीत होणाऱ्या या विशेष बैठकीसाठी काँग्रेसने राज्यातील प्रमुख नेत्यांना बोलावले आहे. ज्यांच्याशी सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी राज्यातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे विरोधपक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस नेते के सी पाडवी अशा सहा प्रमुख नेत्यांना बोलवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत सोनिया गांधी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थिती, काँग्रेसचे स्थान, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना हे सर्व सोनिया गांधी जाणून घेतील. त्यानंतर एका पत्रकार परिषदेद्वारे बैठकीतील निर्णय जाहीर करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



























































