
सामना प्रतिनिधी, लातूर
दुकान टाकण्यासाठी माहेराहून 2 लाख रुपये घेऊन यावेत म्हणून सासरच्या मंडळींनी छळ केल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. हुंड्याखेरीज ‘तू मला आवडत नाहीस, काळी आहेस’ म्हणून चारित्र्यावर संशय घेऊन छळ करणाऱ्या नवऱ्यासह 6 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कानोपात्रा नागनाथ रायफले (रा.गव्हाण ता.रेणापूर) हिने लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीचे लग्न नागनाथ अंकुश रायफले याच्याशी 27 एप्रिल 2018 रोजी झाले. लग्नानंतर एक महिना चांगले नांदवले. नंतर दुकान टाकण्यासाठी 2 लाख रुपये आणावेत म्हणून सासरच्या मंडळींनी छळ केला. लग्नात तुझ्या वडिलांनी हुंडा कमी दिला, आमच्या मनाप्रमाणे लग्न करून दिले नाही. लग्नात काहीच वस्तू दिल्या नाहीत. तुला काहीपण येत नाही, असे म्हणून छळ करीत होते. तर नवरा ‘तू मला आवडत नाहीस, तू काळी आहेस’ म्हणून चारित्र्यावर संशय घेऊन छळ करीत होते. दिवाळसणासाठी माहेरी गेल्यानंतर पुन्हा नांदवण्यासाठी नेले नाही. या प्रकरणी नागनाथ रायफले, प्रभावती अंकुश रायफले, अंकुश नामदेव रायफले, काकासाहेब अंकुश रायफले, अंकीत अंकुश रायफले, शिवकन्या काकासाहेब रायफले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































