कश्मीरात शोपियनमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

सुरक्षा दलाच्या जवानांनी आज कश्मीर खोऱयात शोपियन जिल्हय़ात हिपुरा बाटागुंड गावात एका थरारक चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीदरम्यान, 34 राष्ट्रीय रायफल्सचा सुरक्षा दलाचा नाझीर अहमद हा जवान शहीद झाला. एक जवान जखमी झाला आहे. दुसरीकडे या एन्काऊंटरवेळी फुटीरतावाद्यांनी केलेल्या दगडफेकीत एक नागरिक ठार झाला, तर चार नागरिक जखमी झाले.

हिजबुल, तोयबाला दणका
सहा मृतांपैकी पाच दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचे आहेत. दक्षिण कश्मीरात अनंतनाग जिल्हय़ात बिजबेहरामध्ये गुरुवारी झालेल्या चकमकीत हे सहा दहशतवादी मारले गेले. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांचा समावेश होता. यामुळे या दहशतवादी संघटनांना जबरदस्त दणका बसला आहे.

फुटीरतावाद्यांची जवानांवर दगडफेक
या एन्काऊंटरच्या वेळी काही फुटीरतावादी कश्मिरी तरुणांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक सुरू केल्याने यावेळी जवान आणि फुटीरतावाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीवेळी कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये यासाठी शोपियन जिल्हय़ात मोबाईल, इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली होती.
मुश्ताक अहमद मीर, महम्मद अब्बास भट, उमर माजिद गनी, मोहम्मद वासीम वागय, खालीद फारुक माली अशी पाच मृत दहशतवाद्यांची ओळख पटलेली आहे. हे सर्वजण स्थानिक आहेत. हे सर्व दहशतवादी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनांचे आहेत.

72 तासांत 12 दहशतवादी उडवले
हिपुरा बाटागुंडमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यापूर्वी अनंतनागमध्ये बिजेबेहारी येथे 23 नोव्हेंबर रोजी सहा दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला. हे दहशतवादी हिजबुल आणि तोयबाचे होते. यामुळे 72 तासांत जवानांनी 12 दहशतवाद्यांना उडवले आहे.