
मुसळधार पावसामुळे चेंबूरच्या घाटला रोड येथील प्रशांत निवास सोसायटीतील एका फ्लॅटच्या छताचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक ज्येष्ठ नागरिक थोडक्यात बचावला. ही माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. याबाबत रहिवासीयांनी संताप व्यक्त केला. इमारत धोकादायक झाली आहे. महापालिकेने स्ट्रक्चलर ऑडिट करण्याची नोटीस बजावली आहे. तरीही कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या संदर्भात महापालिकेकडून इमारतीला नोटीस बजावण्यात आली असून स्ट्रक्चलर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या विषयावर 24 जून रोजी सोसायटीने स्ट्रक्चलर ऑडिटसाठी सहकार्य करण्याबाबत एक परिपत्रक काढले. त्यानंतर 27 जून रोजी एक विशेष सभा बोलावण्याची नोटीस काढली होती. ही सभा पार पडली. मात्र, महापालिकेने नोटीस बजावूनही सोसायटीकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सोसायटीने वेळीच लक्ष देऊन इमारतीचे स्ट्रक्चलर ऑडिट व दुरुस्तीचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी होत आहे.
स्ट्रक्चरल ऑडिट करणार
याबाबत इमारतीच्या एका पदाधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी सोसायटीत अशी कोणतीही दुर्घटना घडली नसून चुकीची माहिती असल्याचे स्पष्ट केले. इमारत धोकादायक झाली असून महापालिकेने प्रशांत निवास सोसायटीसह आसपासच्या अनेक इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशांत सोसायटी देखील महापालिका प्रशासनाला सहकार्य करणार असून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले जाणार असल्याचे सांगितले.

























































