
सामना प्रतिनिधी । नगर
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला शहरातील कत्तलखान्याचा विषय मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. कत्तलखान्यासाठी जागा उपलब्ध करण्याबाबत महासभेने केलेल्या ठरावानुसा जुन्या मल:निस्सारण प्रकल्पाजवळील जागेवर कत्तलखाना उभारणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर अखेर हा प्रस्ताव मंजूर झाला असून मनपाने प्रस्तावित केलेल्या जागेवर कत्तलखाना उभारणीस बुधवारी मान्यता देण्यात आली आहे. या माध्यमातून मोठा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे महापौर सुरेखा कदम यांनी सांगितले.
महापालिका क्षेत्रात अधिकृत कत्तलखाना नसल्यामुळे अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे कत्तलखाने सुरु आहेत. त्यामुळे ‘ऍनिलमल वेस्ट’ची गंभीर समस्याही निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नाबाबत महासभेत चर्चा करुन सोलापूर रोडवरील जुन्या मलःनिस्सारण प्रकल्पाजवळ असलेली महापालिकेच्या मालकीची जागा प्रस्तावित करण्यात आली होती. या जागेच्या वापराला मंज़ुरी मिळण्यासाठी प्रशासनामार्फत नगररचना विभागाच्या नाशिक येथील संचालकांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तेथील सहसंचालक प्रतिभा भदाणे यांनी सप्टेंबर महिन्यात जागा वापराबाबत मंजुरी देऊन अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव पुणे येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविला होता. राज्याच्या नगररचना विभागाचे संचालक नो. र. शेंडे यांनीही या प्रस्तावाला मंजुरी दिली असून तसे पत्र बुधवारी महापालिकेला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या जागेवर कत्तलखाना उभारणीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे महापौर कदम यांनी म्हटले आहे. दरम्यान मानपाचे प्रभारी नगररचनाकार राजेश पाटील यांनीही या प्रस्तावासाठी प्रयत्न केले,
नागरिकांच्या आरोग्याबाबत दक्षता घ्यावी!
नगररचना विभागाने जागेच्या वापराला परवानगी देतानाच काही अटीही घातल्या आहेत. सदर कत्तलखान्यासाठी १२ मीटर रुंदीचा रस्ता करण्यात यावा. मनपाच्या मालकीच्या क्षेत्रातून नियमानुसार बफरझोन प्रस्तावित करावा. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावा. कत्तलखाना वापरामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, तसेच पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे नगररचना विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

































































