
सामना प्रतिनिधी । मुंबई
नवी दिल्ली ते वाराणसी मार्गावर धावणाऱया देशातील पहिल्या अत्याधुनिक विनाइंजिनाच्या ट्रेन-18 अर्थात ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला मिळालेल्या यशानंतर आता नवीन ट्रेन-19 येत्या वर्षात येणार असून त्यात ‘स्लिपर कोच’चा समावेश करण्यात येणार आहे. ही विनाइंजिनाची वेगवान ट्रेन राजधानीच्या मार्गावर चालविण्यात येणार आहे.
आयसीएफ कोच फॅक्टरीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ट्रेन-18 ही गाडी केवळ 18 महिन्यांत तयार करून नवा विक्रम केला होता. ही विनाइंजिनाची ट्रेन दर ताशी 160 कि.मी. वेगाने दिल्ली ते वाराणसी हे 752 कि.मी.चे अंतर आठ तासांत कापते.
– ट्रेन-18चे नव्या मॉडेलमध्ये स्लिपर कोचचाही समावेश करण्यात येत असून त्याची बॉडी ऍल्युमिनियमपासून तयार करण्यात येणार आहे. या नव्या मॉडेलमध्ये गुरांपासून धोका टाळण्यासाठी ट्रेनच्या ड्रायव्हर केबिनला कॅटल गार्ड बसवण्यात येणार आहे. तसेच ही ट्रेन दिल्ली ते मुंबई या मार्गावर चालवण्यात येणार असल्याचे रेल्वे बोर्डचे सदस्य (रोलिंग स्टॉक) राजेश अग्रवाल यांनी सांगितले. आयसीएफने 60 हजाराव्या कोचची निर्मिती पूर्ण केली असून त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.






















































