
सांताक्रुझमधील वाकोला येथे प्रकल्पबाधितांसाठी असलेली घरे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (झोपु) सुपूर्द न करता ती परस्पर विकून घोटाळा केल्याचे प्रकरण उघडकीला आले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश ‘झोपु’च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी देऊन सहा महिने झाले, मात्र या घोटाळ्याची चौकशीच अजून झाली नाही. अद्याप विकासक आणि झोपुच्या कर्मचारी-अधिकार्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
सांताक्रुझ पूर्वमधील वाकोला येथे झोपु योजनेतून राबवण्यात येणार्या ‘इम्पीरिअर कोर्ट कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’ला 2010 मध्ये मंजुरी देण्यात आली. 42 झोपडीधारक असलेली ही योजना मे. एम. आर. बिल्डर्सतर्फे विकासक मोहम्मद कुरेशी याने राबवली. या योजनेत प्रकल्पग्रस्तांसाठी विकासकाने 25 घरे देण्याचे मान्य केले, मात्र ही घरे बांधून त्याची परस्पर विक्री करण्यात आली. यातील केवळ 7 घरे झोपु प्राधिकरणाने पात्र ठरवली होती. प्रकल्पग्रस्तांसाठी घरे बांधून झाल्यावर ती झोपु प्राधिकरणाला देणे विकासकाला बंधनकारक होते, मात्र तसे झाले नाही. यात विकासक आणि ‘झोपु’तील कर्मचारी-अधिकार्यांचे साटेलोटे असल्याचा आरोप झाल्यानंतर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मार्च 2019मध्ये दिले, मात्र ही चौकशीच अजून झालेली नाही.
न बांधलेल्या इमारतीतील सदनिकांचीही विक्री
वाकोल्यातील या घोटाळेबाज विकासकाने याच ‘झोपु’ योजनेच्या शेजारी ‘विक्रीसाठी 10 मजली इमारत बांधत आहे. त्यातील सदनिकांची विक्री करायची आहे’ असे सांगत न बांधलेल्या इमारतीतील तब्बल 19 सदनिका लोकांना विकल्या. काही जणांना एकच सदनिका दोन-तीन वेळा विकली पण इमारत अजून बांधलेलीच नाही. या प्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाकडे गुन्हा नोंदवल्यावर त्यांनी हे प्रकरण वाकोला पोलीस ठाण्यात पाठवले. त्यानंतर हे प्रकरण विलेपार्ले पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले, मात्र पोलिसांनीही याबाबत अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही असा आरोप निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप सूर्यवंशी यांनी केला.




























































