
सामना ऑनलाईन। नोएडा
नवी दिल्लीतील इंदिरापुरम येथे राहणाऱ्या अमित व सोनूचे लग्न हे त्याच्यासाठी व त्याच्या नातेवाईकांबरोबरच हॉलच्या मालकासाठी अविस्मरणिय ठरले आहे. कारण लग्नाच्या वरातीत नाचताना नवरदेवासह तीस वऱ्हाडी हॉलच्या अंगणातील पूल तुटल्याने थेट गटारात पडले. यामुळे नवरदेवाचे व इतरांचे कपडे तर खराब झालेच शिवाय लग्नाचा मूहूर्त टळू नये म्हणून लग्नही थोडक्यात आटोपावे लागले. याची नुकसानभरपाई म्हणून अमितने हॉल मालकाकडून 3 लाख रुपये मागितले. त्यानेही ते दिले.
अमित व सोनूचे परवा लग्न झाले. हे लग्न सगळ्यांच्याच लक्षात राहावे म्हणून अमितने सेक्टर 12 मधील हॉल मालकाला हॉलच्या प्रांगणातच तात्पुरता पूल उभारण्यास सांगितले. त्या पूलावरून वरात घेऊन जाण्याची योजना अमितने आखली होती. त्यामुळे ठरल्याप्रमाणे पाहुणे मंडळी सजून धजून वरातीत सामील झाले. नवरदेवही तयार होऊन पूलावर आला. त्यानंतर डीजेच्या दणदणाटात वरातीस सुरूवात झाली. पण वरात पूलावरून थोडेच अंतर गेली असता अचानक पूल कोसळला आणि नवरदेवासह सगळेजण पूलाखालून वाहणाऱ्या गटारात पडले. यात नवरदेवाचे व इतरांचे महागडे कपडे खराब झाले, सोन्याची चेन , अंगठी हरवली. यामुळे संतप्त झालेल्या अमितने हॉल मालकाला पोलिसांची धमकी दिली. पण प्रकरण पोलिसात गेल्यास विषय चिघळेल असे वाटल्याने हॉल मालकाने अमितची माफी मागत. नुकसानभरपाई देण्याची कबुली दिली. त्यानंतर अमित नवीन कपडे घालून मंडपात आला व लग्न सोहळ्यास सुरुवात झाली. पण मुहुर्त टळू नये म्हणून इतरांनी कपडे न बदलता तशाच खराब कपड्यात लग्नात सहभाग घेतला.
























































