‘स्मार्ट क्लोथ’मुळे बेपत्ता जवानांचा शोध लागणार; टेक्सटाईल टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटचे संशोधन

186

आसामच्या पर्वतरांगात- जंगलात सैन्यदलाचे हेलिकॉप्टर गायब होण्याची घटना अलीकडेच घडली होती. या घटनेत जवानांचे मृतदेह शोधण्यामध्ये खूप अडचणी आल्या आणि वेळ गेला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश टेक्सटाईल टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूट ही संस्था जवानांसाठी स्मार्ट क्लोथ तयार करीत आहे. स्मार्ट क्लोथमध्ये बसवण्यात आलेल्या सेन्सर आणि चिपमुळे जवानांचे लोकेशन सहज शोधता येईल आणि अडचणीत असलेल्या जवानांना मदत मिळू शकेल. स्मार्ट क्लोथबाबतचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच यासंदर्भात इन्स्टिटय़ूटचे ज्येष्ठ प्राध्यापक आणि लष्करी अधिकाऱयांची बैठक होणार आहे.

उत्तर प्रदेश टेक्सटाइल टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटच्या इनोव्हेशन सेंटरमध्ये  सेन्सर लावलेल्या कपडय़ांवरील संशोधनासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम टेक्निकल विद्यापीठाकडून 60 लाखांचे अनुदान मिळाले आहे. या प्रकल्पासाठी ज्येष्ठ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी व एमटेक विद्यार्थ्याची टीम बनवण्यात येत आहे.

सिक्युरिटी फिचर, फ्लेक्सिबल बॅटरी

स्मार्ट क्लोथ प्रकल्पाचे प्रमुख प्रा. मुकेश कुमार सिंह यांना सांगितले की, सेन्सर आणि चिप बसवलेला गणवेश परिधान केल्यानंतर जवानांचे लोकेशन शोधणे सोपे जाईल. हे फ्लेक्सिबल सेन्सर असेल. त्यामध्ये सिक्युरिटी फिचर असतील. हा गणवेश घालण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तसेच त्यासाठी फ्लेक्सिबल बॅटरी वापरण्यात येईल.

नॅनो क्लॉथमुळे घामाच्या दुर्गंधीपासून सुटका

सध्या घामाच्या दुर्गंधीपासून सुटका होईल असे कपडे विकसित करण्याचे काम प्रयोगशाळेत सुरू आहे. तुळस, कडुलिंब, कोरफड यांचा वापर करून हे संशोधन केले जात आहे. तसेच संशोधनाच्या दुसऱया टप्प्यात सिल्व्हर क्लोराईड, सिल्व्हर झिंक यांचा वापर करून कपडे अधिक परिणामकारक करण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या