गर्दीच्या ठिकाणी ‘स्मार्ट हेल्मेट’द्वारे थर्मल स्क्रिनिंग; नाशिक बाजार समितीत उपक्रमाला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जैन संघटनेने ‘मिशन झिरो नाशिक’ उपक्रमांतर्गत गर्दीच्या ठिकाणी 11 फुटांवरूनही ताप असलेल्या व्यक्ती शोधणार्‍या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘स्मार्ट हेल्मेट’चा वापर सुरू केला आहे. मुंबई-पुण्यानंतर नाशिक येथे शनिवारी बाजार समितीत याचा शुभारंभ झाला. या हेल्मेटच्या मदतीने शोधलेल्या व्यक्तीची पथकातील डॉक्टरांमार्फत पुढील तपासणी करून गरज भासल्यास अॅण्टिजेन चाचणीची सोय करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाचे संक्रमण झालेल्यांचे त्वरित निदान होऊन संसर्ग रोखणे शक्य होत आहे.

संघटनेकडे सध्या असे चार स्मार्ट हेल्मेट आहेत. पुण्यामध्ये दोन आणि नाशिकमध्ये एक हेल्मेटद्वारे थर्मल स्क्रिनिंग सुरू आहे. संभाजीनगर येथेही त्याचा वापर होणार आहे. नाशिक बाजार समितीत शनिवारी सकाळी हेल्मेटद्वारे तपासणीला सुरुवात झाली. यावेळी संघटनेचे राज्य प्रभारी व समन्वयक नंदकिशोर साखला, राज्य उपाध्यक्ष व समन्वयक दीपक चोपडा, विभागीय सचिव ललित सुराणा, शहराध्यक्ष अभय ब्रह्मेचा आणि डॉ. उल्हास कुटे उपस्थित होते. चार जणांच्या पथकातील एका स्वयंसेवकाने हे हेल्मेट घातलेले असते. त्यांच्यापासून 11 फुटांपर्यंत असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे तापमान जास्त असल्यास त्याची स्क्रिनवर माहिती येते. पथकातील इतर तिघे संबंधित व्यक्तीला गर्दीतून दूर नेत त्याची ऑक्सिजन तपासणी करतात. लक्षणे असल्यास अॅण्टिजेन चाचणी करून पुढील उपचार करण्यात येतात. या पथकाने दिवसभरात बाजार समितीत तपासणीचे काम पूर्ण केले. त्यानंतर पुढील चार दिवसात मेनरोड, शालिमार, कॉलेजरोडसह शहरातील गर्दीच्या ठिकाणी हे पथक कार्यरत राहील, अशी माहिती दीपक चोपडा यांनी दिली.