
सामना प्रतिनिधी । मुंबई
ठाणेकरांना मोबाईलच्या एका क्लिकवर वाहनतळ उपलब्ध करून देणाऱया पालिका आयुक्तांचा महत्त्वाकांक्षी स्मार्ट पार्किंग धोरणच पंक्चर झाले आहे. स्मार्ट पार्किंग धोरण राबविण्यासाठी नेमलेली एजन्सी कुचकामी निघाल्यामुळे हा प्रकल्पच गुंडाळण्याची वेळ पालिकेवर ओढावली आहे. त्यामुळे प्रशासनाने यू टर्न घेत पुन्हा आपली पार्किंग धोरणाची गाडी ‘पे ऍण्ड पार्क’कडे वळवली आहे. त्यासाठी गावदेवी मैदानाजवळ भुयारी, तर ज्युपिटर आणि ठाणे स्थानकाजवळ पार्किंग प्लाझा उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
17 लाख खासगी वाहनांसह ठाणे शहराच्या रस्त्यांवर 20 लाख 45 हजार वाहनांची वर्दळ आहे. दरवर्षी वाहनांच्या संख्येत वाढ होत असताना पार्किंग मात्र बोंब आहे. त्यामुळे शहरातील 166 रस्त्यांवर पार्किंग सुविधा सुरू करण्यासाठी पहिल्यांदा 2008 साली ठाणे महापालिकेने पार्किंग धोरण सादर केले. मात्र पुढे काहीच कार्यवाही झाली नसल्याने पार्किंगचे तीनतेरा वाजले. त्यानंतर 2015 मध्ये पालिकेने सोपी ‘पे ऍण्ड पार्क’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. ठाणे स्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेत असल्याने या योजनेला पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ‘स्मार्ट पार्किंग’ हे नाव दिले. सेंट्रल पार्किंग सर्व्हिसेसचे प्रतिनिधी आणि पालिका आयुक्तांची बैठक होऊन मोबाईलवर पार्किंगची माहिती देणारा हा हायटेक प्रकल्प तातडीने लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र गेल्या तीन वर्षांपासून एजन्सीच्या आडमुठेपणामुळे स्मार्ट पार्किंगच्या गाडीला ब्रेक लागला आहे.
नवीन प्रकल्प
- ठाणे स्थानकाजवळ गावदेवी मैदानाखाली भूमिगत पार्किंग विकसित करण्याची योजना आहे. 7000 चौरस मीटर क्षेत्रामध्ये भूमिगत पार्किंग विकसित केली जाईल. यात 130 कार आणि 120 दुचाकी वाहने ठेवण्याची जागा आहे. ही एक पेड पार्किंग सुविधा असेल आणि ठाणे स्टेशनजवळील पहिले प्लाझा कॉर्पोरेशनद्वारे असेल.
- ज्युपिटर हॉस्पिटलजवळच्या सुविधा भूखंडावर मल्टिलेव्हल पार्किंग सुविधा विकसित करण्याचे प्रस्तावित केले आहे. प्लॉटचे क्षेत्र 1.20 लाख चौरस फूट आहे. सुमारे 1 हजार वाहनांना सामावून घेण्याची क्षमता यामध्ये असून हे काम पुढील वर्षी पूर्ण होईल.
- ठाणे स्थानकाजवळील सरकारी कार्यालयांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. येथेही पार्किंग प्लाझा उभारण्यात येणार असून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
अशी होती स्मार्ट योजना
शहरात विविध ठिकाणी महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या ऑन रोड आणि ऑफ रोड पार्किंगची माहिती स्मार्ट यंत्रणेच्या माध्यमातून मोबाईल ऍपवर मिळणार होती. कुठे पार्किंग व्यवस्था आहे, दर काय, किती वाहने पार्क होऊ शकतात याची माहिती ऍपद्वारे ठाणेकरांना मिळणार होती. इतकेच नव्हे तर पार्किंगनंतर पे स्लीपही मोबाईलवर देण्याची योजना होती. संपूर्ण यंत्रणा जीपीआरएसशी कनेक्ट असल्याने याची सर्व माहिती नियंत्रण केंद्राद्वारे मिळण्याची व्यवस्था होती. शिवाय सर्वेलन्स व्यवस्था, दंड आणि जॅमरची व्यवस्थाही या यंत्रणेशी निगडित होती. सुरुवातीस ज्युपिटर हास्पिटल येथील मोकळ्या भूखंडावर तसेच डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृह या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वाकर ही स्मार्ट पार्किंग यंत्रणा कार्यान्कित करण्याचा प्रयत्न होता.
योजना का बारगळली?
स्मार्ट पार्किंग धोरण राबवण्यासाठी ठाणे महापालिकेने 15 महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण केली. मात्र ज्या एजन्सीला नियुक्त केले त्याच्याकडे हे धोरण राबविण्याची कोणतीच सक्षम यंत्रणा नसल्याचे नंतर उघडकीस आले. तसेच एजन्सीने बँकेची कोणतीच हमी दिली नाही किंवा पीपीपी तत्त्वावरही हा प्रकल्प राबविण्यास नकार दिला. योजना हायटेक असली तरी कोणतीही एजन्सी किंवा ठेकेदार त्यासाठी तयार होत नसल्याने स्मार्ट योजना बारगळली असल्याची कबुली पालिका अधिकाऱयांनी दिली.
पुन्हा जुन्या वळणावर
स्मार्ट पार्किंग बारगळल्यामुळे पालिकेने पुन्हा ‘पे ऍण्ड पार्क’ हा आपला जुना फंडा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पार्किंग प्लाझा उभारण्यासोबत भूमिगत पार्किंग व्यवस्था तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.




























































