
जर तुम्ही स्वस्त किंवा मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आताच घ्या. कारण येत्या काळात स्मार्टफोनच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. या वर्षाच्या चौथ्या तिमाहीपासून (ऑक्टोबर-डिसेंबर) बजेट स्मार्टफोन्सच्या किमती 10 टक्क्यांनी वाढतील असा अंदाज आहे. या किमती वाढण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे मेमरी चिप्स आणि स्टोरेजच्या किमतीत झालेली मोठी वाढ ठरणार आहे. त्यामुळे स्मार्टफोन बनवण्याचा एकूण खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे.
स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या मेमरी चिप्सचे उत्पादन कमी करून चिप उत्पादक कंपन्या आता उच्च-कार्यक्षमता असलेल्या बँडविड्थ मेमरी (एचबीएम) च्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहेत. या एचबीएमला सध्या मोठी मागणी आहे. एआय सर्व्हरसाठी ही मेमरी अत्यंत आवश्यक आहे आणि कंपन्यांना स्मार्टफोनच्या भागांच्या तुलनेत एचबीएम बनवण्यात जास्त नफा मिळत आहे. यामुळे या कंपन्यांनी सर्व ताकद तिकडेच लावण्यास सुरुवात केली आहे. चिप्सची मागणी आणि पुरवठा यांचे गणित बिघडले आहे. त्यामुळे चौथ्या तिमाहीत चिप्सच्या किमतीत 10 टक्के वाढ होऊ शकते. त्यामुळेच स्मार्टफोन महाग होतील.
स्वस्त स्मार्टफोन्समध्ये वापरल्या जाणाऱ्या LPDDR4X एचबीएम चिप्सच्या किमतीत चौथ्या तिमाहीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे स्मार्टफोनमधील स्टोरेजसाठी वापरल्या जाणाऱ्या NAND फ्लॅश स्टोरेजच्या किमतीत 5 ते 10 टक्के वाढ अपेक्षित आहे.




























































