
जम्मू-कश्मीरमध्ये पोस्ट पेड मोबाईल सुविधा सुरू झाल्यानंतर काही तासांतच एसएमएस सेवा ‘सावधगिरीचा उपाय’ म्हणून बंद करण्यात आली. 72 दिवसांनंतर कश्मीर खोऱ्यातील 10 जिह्यांमधील मोबाईल सेवा इंटरनेटशिवाय सोमवारी दुपारी सुरू करण्यात आली. पण लगेचच सायंकाळी 5 च्या सुमारास एसएमएस सेवा बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 25 लाख प्रीपेड मोबाईल फोन तसेच व्हॉटस्ऍप आणि इंटरनेट सेवा सध्या बंद आहे. ही सेवा केव्हा सुरू होणार याविषयीचा निर्णय पुढील महिन्यात घेण्यात येणार असल्याची माहिती राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली. इंटरनेट सेवा लवकरच पुन्हा सुरू करण्यात येईल. सुरक्षा अधिकारी त्यावर काम करीत असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले. मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून राज्यात अफवा आणि द्वेष पसरविण्यात येऊ नये यासाठी एसएमएस सुविधादेखील बंद करण्यात आली आहे.



























































