
संगमनेर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्ष कारवाईतून घारगांव पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध मांगुर माशांची तस्करी उघडकीस आली आहे. या कारवाईत तब्बल 4 हजार 500 किलो प्रतिबंधित मांगुर मासे आणि दहा लाखांचा ट्रक मिळून एकूण 14 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहिमेवर पाठविण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संगमनेर तालुका परिसरात गुप्त माहितीच्या आधारे कारवाई राबविली. पथकाला माहिती मिळाली की, एका ट्रक मध्ये केंद्र सरकारने बंदी घातलेले मांगुर मासे भरून पुण्याकडे जात आहे. तात्काळ घारगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंत थोरात व त्यांच्या टीमच्या मदतीने नांदुरखंदरमाळ शिवारात सापळा रचून ट्रक ताब्यात घेतला. तपासात ट्रकमध्ये प्रतिबंधित मांगुर मासे असल्याचे निष्पन्न झाले.
ट्रकमधील चारही आरोपी पश्चिम बंगाल राज्यातील असून सुकुमार दुलाल घोष (47) तारक दिलीप सरकार (27) सद्दाम रजरुल सरदार (33) अझरुल आयजुल मंडल (36) अशी नावे आहेत. केलेल्या कारवाईमध्ये हे मासे पश्चिम बंगालमधील मोंन्टु मंडल याने पाठविले असून ते गणेश गायकवाड पुणे यांच्या कडे पोहोचविण्याचे नियोजन होते. यानंतर मत्स्य विकास अधिकारी प्रतिक्षा पाटेकर ,दत्तात्रय मिसाळ यांनी 3 नोव्हेंबर रोजी ट्रकची तपासणी करून मासे हे खरोखरच प्रतिबंधित मांगुर जातीचे असल्याचा अहवाल दिला. तात्काळ कायदेशीर प्रक्रियेनुसार मासे नष्ट करण्यात आले. या प्रकरणी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पाटेकर यांच्या फिर्यादीवरून घारगांव पोलीस ठाण्यात कलम 223, 275, 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि घारगांव पोलिस पथक संयुक्तपणे केली.
            
		





































    
    




















