कश्मीरात स्नाइपर हल्ले वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

कश्मिरी दहशतवाद्यांमध्ये काही अतिप्रशिक्षित दूरवरून लक्ष्य टिपणारे निशानेबाज (स्नाइपर) कार्यरत झालेले असल्याची गोपनीय माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. स्नाइपर होण्यासाठी अतिशय कौशल्याचे प्रदीर्घ प्रशिक्षण घ्यावे लागते. जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या सात दिवसांत स्नाइपर हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत.

स्नाइपर ज्या भागात संभाव्य दहशतवादी हल्ला करायचा अशा भागातील अज्ञात ठिकाणी लपून राहतात. दहशतवाद्यांचा दुसरा गट हल्ला करतो. सुरक्षा यंत्रणा या दहशतवाद्यांचा मुकाबला करत असताना अज्ञात ठिकाणी लपलेले दहशतवादी अचानक अचूक गोळीबार करून लष्करी जवानांना टिपतात. दहशतवादविरोधी संपूर्ण कारवाई संपल्यानंतर बराच काळपर्यंत आहे तेथेच लपून राहून नंतर सुरक्षितरीत्या पळून जातात.

गेल्या 22 ऑक्टोबर रोजी लष्करातील एक जवान अतिशय दूरवरून टिपलेल्या गोळीबारात शहीद झाला होता. त्यानंतर तीनच दिवसांनी आणखी एक जवान अशाच प्रकारे शहीद करण्यात आला. आता शनिवारी सीआयएसएफचे अधिकारी राजेंद्र प्रसाद अशाच अज्ञात हल्ल्यात शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांच्या या नवीन कार्यपद्धतीमुळे सुरक्षा यंत्रणेला आता वेगळय़ाच समस्येचा मुकाबला करावा लागत आहे. दहशतवादी हाच फंडा व्हीआयपींना टिपण्यासाठी वापरू शकतात अशी शक्यता गुप्तचर यंत्रणेला वाटत असल्यामुळे गुप्तहेर यंत्रणेची चिंता वाढली आहे.

दिवसभरात तीन हल्ले, दोन ठार
रविवारी कश्मीरात तीन दहशतवादी हल्ले झाले. पीडीपी नेते आणि माजी मंत्री सय्यद बुखारी यांचे सहकारी मोहम्मद अमीन दार यांची दहशतवाद्यांनी गोळय़ा घालून हत्या केली.
शोपिया येथे पेट्रोलिंग करणाऱया लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दक्षिण कश्मीरातील पोतेरवाल गावात ही घटना घडली. लष्कराने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताच दहशतवाद्यांनी पळ काढला.
दहशतवाद्यांनी आज सीआयडीचे उपनिरीक्षक इम्तियाज अहमद मीर यांची गोळय़ा घालून हत्या केली. मीर डय़ुटी संपवून घरी परतत असताना हा हल्ला झाला. चेवा कलीन भागातून त्यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.

summary- sniper attack in kashmir