
गरम हवा, कडक उन्हाळा आणि विस्तीर्ण वाळवंट अशी ओळख असलेल्या सौदी अरेबियात चक्क बर्फ पडतोय. सौदीच्या अनेक भागांत बर्फवृष्टी, मुसळधार पाऊस आणि घसरते तापमान यामुळे लोक चिंतीत झाले आहेत. क्लायमेट चेंजमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. उत्तर सौदीत तबुक प्रांतातील बर्फवृष्टीमुळे पर्वतीय शृंखलेचे रूप पालटले. जेबेल अल लॉजवरील उंच भाग पाऊस आणि बर्फाने झाकला गेला. हा भाग 2600 मीटर उंचीवर आहे. हेल प्रांताच्या आजूबाजूच्या भागातही बर्फ पडला. अनेक शहरांतील तापमान शून्याच्या खाली गेले. नॅशनल सेंटर फॉर मेटरोलॉजीचे प्रवत्ते हुसैन अल कहतानी यांनी सांगितले की, मध्य आणि उत्तरेकडील भागात थंड हवेचा प्रवाह आल्यामुळे व त्याचा पावसाच्या ढगाशी संबंध आल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीने वाहने चालवण्याचा सूचना दिल्या आहेत. खबरदारी म्हणून राजधानी रियाधमधील शाळांना ऑनलाईन शिक्षण घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

























































