सोशल सर्व्हिस लीगला सरकारने मदतीचा हात द्यावा; अतिवृष्टीमुळे संस्थेचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांना सक्षम बनवण्यासाठी गेली 108 वर्षे कार्यरत असलेल्या परळच्या सोशल सर्व्हिस लीग या संस्थेचे 21 आणि 22 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 50 लाखांहून जास्त नुकसान झाले आहे. आधीच लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांत संस्थेचे 30 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे संस्थेला राज्य सरकारने आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी संस्थेने केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनची झळ सोशल सर्व्हिस लीग या सामाजिक-शैक्षणिक संस्थेला बसली. त्यात 21 आणि 22 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीत संस्थेच्या दामोदर हॉल या नाट्यगृहाच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचणारे पाणी थेट नाट्यगृहात शिरले. नाट्यगृह सखल भागात बांधले गेल्यामुळे नाट्यगृहाच्या स्टेजकडील बाजूने पाणी आत शिरले. त्यामुळे नाट्यगृहाच्या साऊंड सिस्टमसह 400 खुर्च्यांचे मिळून 35 लाखांचे नुकसान झाले. त्याचबरोबर संस्थेचे कार्यालय, ग्रंथालय, व्यायामशाळा तसेच इतर अनेक विभागांमध्ये पाणी शिरल्यामुळे संस्थेचे मोठे नुकसान झाले. संस्थेच्या कामाचा आवाका मोठा असल्यामुळे झालेले नुकसानही मोठे आहे.

प्रत्येक घटकासाठी झटणारी संस्था
परळमध्ये 1911 साली सुरू झालेल्या या संस्थेने तिच्या अस्तित्वापासूनच सामाजिक बांधिलकी जपत समाजातील प्रत्येक घटकांना सबळ बनवण्यासाठी झटत आली आहे. अतिवृष्टीमुळे संस्थेच्या संकुलातील वस्तूंचे नुकसान दुरुस्तीच्या पलीकडे गेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने संस्थेला अडचणीतून सोडवण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष आनंद माईणकर आणि सचिव चंद्रकांत खोपडे यांनी केली आहे.

संस्थेची वाटचाल सुकर व्हावी!
परळसारख्या गिरणगावात असूनही संस्थेचा नावलौकिक मोठा आहे. संस्थेच्या अध्यक्षपद जमशेदजी टाटा, एचडीएफसी बँकेचे संस्थापक एच. टी. पारिख तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांतील अनेक दिग्गजांनी भूषवले आहे. मात्र सध्या संस्थेच्या उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत. संस्थेला पुन्हा उभारी मिळण्यासाठी आणि पुढील वाटचाल सुकर होण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भारत म्हाडगुत यांनी केली आहे.