
>>मेधा पालकर
आनंदवनपासून पाबळच्या विज्ञान शाळेपर्यंत भेटी देण्यासाठी पर्यटकांची पावले या ‘समाजक्षेत्रां’कडे वळू लागली आहेत. आनंदवन, हेमलकसाला भेटी देणाऱया पर्यटकांची संख्या वाढत आहे. शिवाय नगरमधील राळेगणसिद्धी व हिवरेबाजार, स्नेहालय, गडचिरोलीतील शोधग्राम, मेळघाटमधील संपूर्ण बांबू प्रकल्प, पुण्यातील विज्ञान आश्रम, सावली या स्थळांना भेटी देणाऱयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सामाजिक पर्यटनाच्या या सफरीतून पर्यटकांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. सामाजिक पर्यटनाच्या या विविध बाजूंचा वेध घेणारा हा लेख.
उन्हाळ्याची सुट्टी लागली की, पर्यटनाला जायचं, खूप मज्जा करायची हे ठरलेलं. कोणी थंड हवेच्या, तर कोणी समुद्रकिनारी, तर कोणी परदेशी सहलीला जाण्याचे बेत आखतात, पण सध्या सामाजिक पर्यटन चांगलेच पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहे. महाराष्ट्रातील दुर्गम भागातील लोकांसाठी अमूल्य काम करणाऱया सामाजिक संस्थांच्या कार्याची प्रत्यक्ष भेट देऊन ओळख करून घेतली जात आहे. आपले काही सामाजिक योगदान असावे म्हणून प्रत्यक्ष कार्यात सहभागी होणारे पर्यटक दिसत आहेत.
आनंदवनपासून पाबळच्या विज्ञान शाळेपर्यंत भेटी देण्यासाठी पर्यटकांची पावले या ‘समाजक्षेत्रां’कडे वळू लागली आहेत. आनंदवन, हेमलकसाला भेटी देणाऱया पर्यटकांची संख्या वाढत आहे. शिवाय नगरमधील राळेगणसिद्धी व हिवरेबाजार, स्नेहालय, गडचिरोलीतील शोधग्राम, मेळघाटमधील संपूर्ण बांबू प्रकल्प, पुण्यातील विज्ञान आश्रम, सावली या स्थळांना भेटी देणाऱयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गत ‘अमृतयात्रे’द्वारे सामाजिक सहली आयोजित केल्या जातात.
महामंडळाचे हे सोशल टुरिझम शहरातील पर्यटकांची गावातील मातीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करत आहे. पर्यटन ही संकल्पना आता दिवाळी, नाताळ किंवा उन्हाळ्याच्या सुट्टय़ांपुरती मर्यादित राहिली नसून अलीकडे पर्यटक वेळ मिळाला की, भटकंतीला बाहेर पडतात. प्रत्येक वेळी एखाद्या हिल स्टेशनवर अथवा गर्दीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा त्यांना दुर्गम भागाविषयी आकर्षण वाटत आहे.
सोशल नेटवर्किंग साइट आणि माध्यमांमुळे स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते तसेच वेगवेगळ्या गावांनी केलेली उल्लेखनीय कामे शहरातील लोकांपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे लोकांना या ठिकाणांविषयी, तेथील व्यक्तींविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. या गावांमध्ये कसे जायचे, राहायची सोय आहे का याबद्दल पर्यटकांकडून विचारणा होताना दिसते.
जागतिक पर्यटनाच्या क्रमवारीत हिंदुस्थान अग्रेसर आहे. देशातील वैविध्याचा विचार करता हिंदुस्थानला प्रगतीसाठी पर्यटन ही आणखी एक संधी आहे. खरंतर एका बाजूला मजेसाठी पर्यटनाचे प्रमाण काढत असतानाच दुसरीकडे सामाजिक पर्यटनाचा किचारही हळुहळू रुजू लागला आहे. तरुण आणि परदेशी पर्यटकांपर्यंत सामाजिक पर्यटनाचा मार्ग पोहोचला, तर तो स्थानिकांसाठी आणि निसर्गासाठीही अधिक शाश्वत ठरू शकेल. सामाजिक पर्यटनाच्या या सफरीतून पर्यटकांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. पर्यटक मूलभूत गरजांपासून कंचित राहिलेल्या लोकांविषयी अधिक संवेदनशील होतात. अनेकांना आयुष्य समृद्ध करणारा अनुभव मिळतो.
सामाजिक पर्यटनामध्ये पहिल्या टप्प्यात आनंदवन, हेमलकसा, अण्णा हजारे यांचे गाव राळेगणसिद्धी आणि पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार या गावांचा समावेश आहे. याला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. शिवाय परदेशी पर्यटकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सामाजिक पर्यटनाला हा वाढता प्रतिसाद पाहून पोपटराव पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘गावातील जीवनशैली, येथील संस्कृती आणि समस्या जाणून घेण्यासाठी शहरातील लोक पर्यटनासाठी आमच्याकडे येतात. ही नक्कीच चांगली सुरुवात आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटकांची संख्या वाढली असून त्यांना जलसंवर्धनाविषयी कुतूहल आहे. शहरात मुबलक पाणी वापरणाऱया मंडळींना गावात आल्यावर पाण्याचे महत्त्व कळते. सामाजिक पर्यटनामुळे शहर आणि गावातील तुटलेला संवाद वाढण्यास मदतच होत आहे.’’
बाबा आमटे यांचे कार्य आणि ते पुढे नेणारी त्यांची नवी पिढी कसे काम करते हे पाहण्यासाठी आनंदवनला सहली जातात. सुट्टीमध्ये ही गर्दी वाढत जाते. याविषयी कौस्तुभ आमटे म्हणाले, ‘‘1997 पर्यंत आनंदवनात कोणी पाहुणा आला तर त्याचे कौतुक वाटायचे. मात्र वर्षभराची नोंदणी आधीच झालेली असते. साधारण 2003 नंतर आनंदवनात भेटी देणाऱयांची संख्या वाढली. आता पर्यटकांची गर्दी आवरणे कठीण झाले आहे.’’
असेच वातावरण मेळघाटात आहे. सुरुवातीला मेळघाट म्हणजे कुपोषण असा समज होता. आता गेल्या काही वर्षांत मेळघाटाचे बदलले रूप पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यांचा उद्देश फिरण्यापेक्षा इथले काम जाणून घेण्यात, ज्ञान मिळविण्यात असतो. तिथल्या स्वावलंबनाचे संस्कार नकळत पर्यटकांवरही होतात.
सामाजिक पर्यटन म्हणजे दु:खाचे प्रदर्शन नव्हे, तर या दु:खावर, प्रतिकूलतेकर मात करून उभे असलेल्यांचा लढा आहे, पर्यटनाच्या माध्यमातून हे प्रेरणादायी चित्र जगासमोर पोहोचले पाहिजे. निसर्ग पर्यटनाइतकाच सामाजिक पर्यटनाला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे. यातून सामाजिक कार्याला मदत करण्याची समाजातील लोकांची मानसिकता तयार होत आहे. हे नक्कीच चांगले चित्र आहे.




























































