कर्तृत्ववान दीपस्तंभ!

713

>> मंजुश्री कुळकर्णी

एकविसाव्या शतकाच्या एकूणच यांत्रिकी – तांत्रिकीकरणामुळे संवेदनशीलता हरवत चालली आहे की काय अशी भीती प्रत्येकालाच वाटून जाते. हे असह्य झालं की, एका अनामिक समाधानाच्या शोधात माणुसकी बाहेर पडते. दृष्टीस पडतो तो ‘दीपस्तंभ’. या ठिकाणी दिसतात अपंगत्वाच्या चक्रव्यूहात अडकलेले अभिमन्यू, दिसतात गरिबीनी ग्रासलेले सुदामापुत्र, तर आप्तांनी झिडकारलेले विदुर मित्र! दीपस्तंभाच्या भक्कम आधारामुळे हे लढवय्ये स्वकर्तृत्वाचा चढता आलेख काढू लागतात. यजुवेंद्र महाजन यांनी स्थापन केलेल्या दीपस्तंभ फाऊंडेशनचा वर्धापन दिवस दरवर्षी 27 मार्चला साजरा होतो तो वेगवेगळय़ा क्षेत्रांतील समाजासाठी आयुष्य झोकून देणाऱया तरुणांना गौरविण्यासाठी…

जळगाव येथील यजुर्वेंद्र महाजन यांनी एका उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन, अतिशय योजनाबद्ध पद्धतीने, प्रचंड इच्छाशक्तीच्या ताकदीने 27 मार्च 2005रोजी ‘दीपस्तंभ फाऊंडेशन’ची मुहूर्तमेढ रोवली. या चौदा वर्षांत ग्रामीण भागातील अनेक गरीब, आदिवासी, अपंग, अनाथ विद्यार्थी प्रशासकीय सेवेत रुजू झाले. अनेक दिव्यांग, निराधार स्वावलंबनासह उत्तम आयुष्य जगू लागले. एकीकडे मिळत असलेल्या यशामुळे पावलांना गती मिळत गेली, तर दुसरीकडे कामाची व्याप्तीही वाढत गेली. हिंदुस्थानभ्रमंतीतून लोकसंग्रह वाढला, मदतीचे हात हाती आले. या सर्वांप्रति ऋण व्यक्त करणं हे एक कर्तव्य वाटू लागले. अनेक सामाजिक प्रश्नांवर झोकून देऊन काम करणारी तरुणाई समोर होती, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं गरजेचे वाटले. अनेक असे विषय असतात की, ते ‘अक्षर’ माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असतात. अशा सगळ्या विचारमंथनातून साकारली गेली वर्धापन दिनाची रूपरेषा! कार्याचा वर्षभराचा आढावा, अनेक सेवाव्रतींचा सन्मान, काही पुस्तकांचे प्रकाशन असा दिव्यांग विद्यार्थ्यांनी ‘सांभाळलेला’ हा सोहळा महाराष्ट्रातल्या दीपस्तंभप्रेमींच्या साक्षीने कांताई सभागृहात नुकताच संपन्न झाला. स्व. डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समर्पित भावनेने समाजातील विविध क्षेत्रांत निःस्वार्थ सेवेचा, गुणवत्तापूर्ण कार्याचा आदर्श वस्तुपाठ निर्माण करणाऱया व समाजाच्या सुख-दुःखांशी समरस झालेल्या, संवेदनशील ‘कार्यकर्त्यांचा’ सन्मान दीपस्तंभ फाऊंडेशनद्वारे केला जातो.

आतापर्यंत ज्या तरुणांना पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले त्यात झाडपोली पालघर या आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अमूल्य योगदान देणारे नीलेश सांबरे (अध्यक्ष-जिजाऊ प्रतिष्ठान, पालघर) यांना ‘दीपस्तंभ कर्मवीर पुरस्कार’ दिला गेला. ‘यश मिळवायचे तर झोपेत नव्हे, जागेपणी स्वप्न पाहा आणि ते पूर्ण करण्यासाठी परिश्रम करा!’ पुरस्कार स्वीकारताना हा मूलमंत्र देणाऱया नीलेशनी ‘दीपस्तंभ मनोबल’च्या 11 विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारलं. ही देवाणघेवाण उपस्थितांना सुखावून गेली.

दुसरा दीपस्तंभ विवेकानंद पुरस्कार दिला गेला ‘सनराइज कँडल्स’च्या माध्यमातून स्वतः लाखोंची उलाढाल करत, हजारो दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजक बनवणाऱया महाबळेश्वर येथील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त भावेश भाटीया यांना. भावेशनी स्वप्रयत्नाने अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विकसित केलं. त्यातला एक गुण म्हणजे वत्तृत्व… अवघ्या काही सेकंदांत सभागृहातील प्रेक्षक ध्यानस्थ झाल्यागत भावेशला ऐकत असतात. मातृभक्त असलेला भावेश आयुष्यातील पत्नीचे स्थानही अतिशय शायराना अंदाजात जपताना दिसतो आणि पुरस्कार स्वीकारत सांगून जातो की, जे कामाला धर्म मानतात त्यांना निसर्ग मदत करतो.

तिसरा पुरस्कार दिला गेला जळगावपुत्र असलेला, आता पुणे विद्यापीठाच्या ब्लाइंड विभागाचा कोऑर्डिनेटर असलेल्या, सर्व अंधमित्रांना ‘टेक्नोसॅव्ही व्हा’ सांगत प्रशिक्षितही करणाऱया धनंजय भोळेला. ‘राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले, पण जन्मभूमीतला हा पुरस्कार विशेष वाटून गेला’ सांगत पठडीबाहेरचा विचार करून करीअर घडवायला पाहिजे असे आग्रही मतही धनंजयने मांडले. स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी चालवणाऱया आणि पीएच.डी. करणाऱया या प्रज्ञाचक्षु तरुणाला ‘दीपस्तंभ युवा प्रेरणा पुरस्कार’ दिल्याचे समाधान निवड समितीला मिळाले असेल!

दीपस्तंभ युवा प्रेरणा पुरस्काराचा पुढचा मानकरी होता वडोदरा येथील प्रशांत गाडे! शिक्षण – नोकरी अशा सामान्य रुळावरून न जाता एखादी अनवट वाट निवडावी असं तीव्रतेने वाटले. अशातच हात नसलेला कुणी नजरेस पडला आणि भविष्य घडवणारे कृत्रिम हात बनवण्याचा निर्धार प्रशांतने केला. विरोधासह येणारे अडथळे पार केले, दिवस-रात्र एक करून अत्यंत कमी किमतीत हे हात बनवण्यात यश मिळवले. मनोबलच्या लक्ष्मीच्या चेहऱयावर सदैव विराजमान असणारं मोहक हास्य अधिक देखणे झाले जेव्हा तिला आपल्याला लवकरच हात मिळणार हे समजले. हातांशिवाय आयुष्य कसे जगत असेल? यातून व्यक्त होणाऱया अनेक अनाकलनीय समस्यांचा अंत या ठिकाणी झाला. प्रशांतच्या या उपलब्धीचा प्रवास ऐकताना सारेच स्तब्ध झाले होते!

अपूर्वा जोशी (ठाणे)चे वडील ठामपणे सांगतात ‘माझी मुलगी बहिरी आहे’ अन् पुढे ताठ मानेने म्हणतात ‘मला तिचा अभिमान आहे!’ हा अभिमान एव्हाना जोशी कुटुंबीयांपुरताच मर्यादित राहिला नाही, तर अवघ्या महाराष्ट्राला वाटावा असा विस्तारला आहे. स्वतः या अपंगत्वावर विजय मिळवत अपूर्वाने कर्णबधिर बालकांसाठीच काम करण्याचा निर्णय घेतला. अपंगत्वाचा स्वीकार जेव्हढा लवकर व सकारात्मक होईल तेव्हढी प्रगती गतीने होऊन सामाजिक योगदान देण्यासाठी सक्षम होता येतं हे कृतीने दाखवून देणाऱया अपूर्वाचे ‘दीपस्तंभ युवा प्रेरणा पुरस्कार’ स्वीकारतानाचे मनोगत लोभस होते!

दृढ संकल्प आणि कृती यात जो
भाव आहे तो म्हणजे अद्वैत दंडवते! जळगावमधील तरुण पिढीवर गर्व वाटावा अशी मांदियाळी जळगावात नांदते. समस्या या सर्वदूर सारख्याच असतात पण त्या दिसणं आणि दूर करण्यासाठी पावलं वळणं हे जरासं दुर्मीळच! असे वेगळेपण बाळगणाऱया अद्वैत दंडवतेनी कचरा वेचणाऱया व वेचणाऱयांच्या मुलांचं विधिलिखित बदलवण्याचा विडा उचलला. ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवण्याची ही रीत दीपस्तंभला भावली आणि अद्वैतची ‘युवा प्रेरणा पुरस्कारा’साठी निवड केली गेली. ‘या मुलांचं बदलतं रूप मला पुढे जाण्याची ऊर्मी देतं’, हसतमुख अद्वैत सहज सांगून जातो!

डॉ. सुनील लवटे एक असामान्य देवतुल्य व्यक्तिमत्त्व! शिक्षण, साहित्य या क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे पण अनाथांना सनाथ करण्यासाठीच्या प्रयत्नांना प्रणाम आहे! हा प्रणाम डॉ. सुनील लवटे यांना ‘दीपस्तंभ जीवन गौरव पुरस्कार’ देऊन केला. जन्मानंतर किती तरी दिवस ‘ह.ह 49’ (नाव नसलेला) अशी ओळख असलेला हा एक आदर्श जीवनव्रती म्हणून जगासमोर आला. जन्माला घालून कुमारीमाता निघून गेली. शेजारच्या खाटेवर असलेल्या यशोदेने आपल्या अधिकीचा पान्हा पाजून या कान्हाला जगवलं. ‘देण्यानी पाझर आटत नाही’ हे बाळकडू मिळाल्याने पुढे अनाथांचा नाथ होणं अपरिहार्य होतं! अनाथांच्या वा वंचितांच्या प्रश्नावर उत्तरं शोधण्यासाठी देशाचे प्रतिनिधी म्हणून अनेक देशांमध्ये जाऊन आलेत. तिथले अनाथाश्रम पाहून आपल्याकडे तशा सुधारणा कराव्यात म्हणून पाहायला गेले आणि समजले की, अनाथाश्रम नाहीतच! समाज या मुलांचा सांभाळ करतो, एकटेपण जाणवू देत नाही… आता हीच अपेक्षा आणि आशा हिंदुस्थानी समाजाकडून डॉ. सुनील लवटे यांना आहे!

आपली प्रतिक्रिया द्या