
सोलापूर शहरात गेल्या तीन दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून सोमवारी दुपारपर्यंत रुग्णांची संख्या 21 झाली आहे. यातील दोघांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि 19 जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यानी दिली.
आज आढळलेल्या 6 रुग्णात 4 पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. आढळलेले नवीन रुग्ण बापूजी नगर, भद्रावती पेठ, कुर्बान हुसेन झोपडपट्टी, पाच्छा पेठ येथील आहेत. आतापर्यंत सोलापुरात कोरोना संशयीत 778 जणांची चाचणी घेण्यात आली. 569 जणांचे अहवाल आले आहेत तर 209 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. प्राप्त 569 पैकी 548 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर 21 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
सोलापुरात सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून पूर्णपणे संचारबंदी आदेश लागू झाले आहेत. अत्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा आता 23 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील. यात किराणा दुकान, खासगी औषध दुकान, बँका, भाजीपाला यांचाही समावेश आहे.
पेट्रोल पंपावर ही आता केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकीय विभागाची वाहनं यांनाच पेट्रोल मिळणार आहे. इतरांना पेट्रोल मिळणार नाही. सोलापूरकरांनी आज पासूनच्या संचारबंदीचा अत्यंत काटेकोरपणे पालन करावं. रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी एकटे किंवा एकत्रितपणे येणे टाळावेच, असे आवाहनही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं आहे.
कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी सोशल डिसस्टशन व नागरिकांनी घराबाहेर पडू नये यापेक्षा वेगळा उपाय सध्या तरी नाही असेही जिल्हाधिकारी मिलिंदजी शंभरकर म्हणाले. गेल्या तीन दिवसापासून शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे.
























































