
गुंठेवारीला परवानगी मिळत नसल्याने शहरातील अनेक मालमत्ताधारक अडचणीत सापडले आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांच्या अडचणी सुटाव्यात म्हणून महापौर श्रीकांचना यन्नम यांनी हमीपत्रावर गुंठेवारीला परवानगी द्यावी, अशी मागणी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे. त्यावर पुढील आठ दिवसांत निर्णय अपेक्षित आहे.
शहरातील गुंठेवारीला परवानगी नसतानाही अनेक जागांची खरेदी-विक्री झाली. त्या ठिकाणी बांधकामेही झाली. अनेकांनी जागा घेऊन ठेवल्या; परंतु त्या ठिकाणी बांधकाम झालेले नाही. हद्दवाढ भागात नगरांची निर्मिती झाली; परंतु सोयी-सुविधा पोहोचलेल्या नाहीत. दुसरीकडे अनेक खुल्या जागांची विक्रीही थांबली आहे. शहराचा विस्तार होत असतानाच अशा परिस्थितीत गुंठेवारीला परवानगी मिळणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने काही दिवसांपूर्वी नवीन आदेश काढला आणि गुंठेवारीला परवानगी देताना संबंधित जागेची मोजणी बंधनकारक केली आहे.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काही महिन्यांपूर्वी गुंठेवारीसंबंधित अर्ज मागविले होते. त्यानुसार जवळपास दोन हजारांपर्यंत अर्ज प्राप्त झाले. त्या जागांच्या मोजणीचा प्रस्ताव भूमिअभिलेख कार्यालयाकडे पाठविण्यात आला. तत्पूर्वी, गुंठेवारीला हमीपत्रावर परवानगी द्यावी, अशी मागणी सत्ताधाऱयांनी केली आहे. त्याला विरोधकांनीही साथ दिली आहे. तसा निर्णय झाल्यास अनेक वर्षांपासून गुंठेवारी परवानगीसाठी संघर्ष करणाऱयांना दिलासा मिळणार आहे.



























































