
महापालिकेच्या वतीने शहरातील पाण्याचे बिल वर्षातून एकदा वसूल करण्यात येते. त्यात बदल करत आता दर तीन महिन्यांनी बिले वाटप करून वसुली करण्यात येणार आहे. त्याबाबत महापालिकेत असलेल्या उपसमितीत 28 जून रोजी प्रशासकीय ठराव मंजूर झाला आहे. शहरातील प्रत्येक नळास मीटर बसवण्यात येणार आहे. त्यानंतर दर तीन महिन्यांनी बिले वाटप करून वसूल करण्यात येणार आहेत. घरगुती, बिगर घरगुती आणि औद्योगिकसाठी तिमाही बिले देण्यात येणार आहेत.
पाण्याचा वापर किती झाला हे पाहून त्या प्रमाणात बिल देण्याची पद्धत लागू होणार आहे. यामुळे पाण्याचा मर्यादित वापर होणार आहे. आता वार्षिव भाडे असल्याने पाण्याचा वापर अमर्यादित होतो. पुढील काळात मीटर पद्धतीने शहरात एकाचवेळी बिले वाटप करण्यात येणार आहे. एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर, ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च अशी चार टप्प्यांत बिले वाटप करण्यात येतील. महापालिकेने आता शहरात 377 ठिकाणी मीटर लावले आहेत. ती औद्योगिक ठिकाणे आहेत. आगामी काळात प्रत्येक घराला मीटर लावण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने पायलट प्रोजेक्ट म्हणून बाळीकेस परिसरात बुधले गल्ली आणि इतर ठिकाणी इलेक्ट्रिक पाण्याचे मीटर लावण्यात आले. मीटरनुसार बिले वाटप करण्यात येत नाही. भविष्यकाळात मीटरनुसार बिले वाटप करू, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
पाण्याच्या सुरळीत वितरण व्यवस्थेसाठी स्वाडा प्रणाली
शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने 90 कोटी रुपये खर्च करून स्वाडा प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यासाठी काम सुरू आहे. चाचणी करण्यासाठी विजापूर रोड परिसरातील आदित्यनगर पाण्याच्या टाकीसह तीन टाक्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील आठवडय़ात चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. स्वाडा प्रणाली सुरू केल्यावर पाणी सोडण्यासाठी चावीवाल्याची गरज भासणार नाही. स्वयंचलित पद्धतीने पाणीपुरवठा सुरू होईल. पाणी किती दाबाने जाईल याची माहिती नियंत्रण कक्षात मिळणार आहे. विजापूर रोड परिसरातील आदित्यनगर पाण्याच्या टाकीवरून ही चाचणी घेण्यात येणार आहे.




























































