सोलापूरात रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहर व जिल्ह्यातील रुग्णालयात बेड शिल्लक नसल्यामुळे धावपळ सुरू असतानाच, आता रेमडिसीवीर  या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.  रेमडिसीवीर हे इंजेक्शन कोरोना उपचारासाठी वापरले जाते. सोलापूर शहर व जिल्ह्यातील औषध दुकानांमधून इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने रुग्णांची भटकंती सुरू आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढल्याने रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. लष्कर परिसरात असलेल्या हुमा मेडिकलसमोर शनिवारी रात्रीपासून रुग्णांचे नातेवाईक रांगेत उभे राहून  रेमडिसीवीर  इंजेक्शन खरेदी करताना दिसत आहेत. रुग्णालयाचे अधिकृत पत्र, आधार कार्ड आणि कोरोना रिपोर्ट असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन देण्यात येते. शासनाने दिलेल्या नियमानुसारच इंजेक्शनचा साठा असून, नियमावलीनुसार त्याचे वितरण करीत आहोत, असे हुमा मेडिकलचे प्रमुख सईद शेख यांनी सांगितले.

 जिल्ह्यात सध्या एकूण 7049 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी शहरात 3180, तर ग्रामीण भागात 3869 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही रुग्णालये ही तेथील औषध भांडारातून औषधे घेण्याची सक्ती करत आहेत, अशा तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहेत.