मानपान आणि पैशासाठी सुनेचा खून, आत्महत्येचा बनाव उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नात मानपान केलं नाही, अडीनडीला माहेरुन पैसे आणत नाही म्हणून घराची लक्ष्मी समजल्या जाणाऱ्या सुनेचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक बाब सोलापुरात समोर आली. मुलीचा जीव घेतल्याची बातमी समजल्यानंतर संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मुलीचा अंत्यविधी मुलाच्या दारात करुन आपला संताप व्यक्त केला आहे.

काळीज चर्रर्र करणारी ही घटना सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यामधील मिटकलवाडी गावची आहे. पंढरपूर तालुक्यातील उंबरे पागेचे गावातील अंजली नामदेव कदम या तरुणीचा मिटकलवाडी येथील हनुमंत गोवर्धन सुरवसे या तरुणाशी झाला. या विवाहाला सहा वर्षे उलटली. या सहा वर्षात लग्नात मानपान दिले नाही आणि माहेरहून पैसे आणि इतर वस्तू आणण्यासाठी सतत छळ सुरू होता. दरम्यान दोघांना एक मुलगा झाला. मूल झाल्यानंतर नातेवाईक नीट सांभाळ करतील अशी अंजलीच्या आईवडिलांना अपेक्षा होती, मात्र कसलाही बदल झाला नाही.

शेवटी 30 एप्रिल 2022 रोजी अंजलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचा फोन आला. मुलगी गेल्याच्या बातमी सैरभैर झालेल्या नातेवाईकांनी मिटकलवाडी गाठले बरीच शोधाशोध केल्यानंतर शेतातल्या विहिरीत अंजलीचे प्रेत आढळून आले. अंजलीच्या सासरची मंडळी अंजलीने आत्महत्या केली असे सांगत होते तर अंजलीचे आईवडील भाऊ ही आत्महत्या नसून खून करून आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचा आरोप करीत होते. या वर पोलिसांनी शवविच्छेदनानंतर गुन्हा दाखल करू अशी भूमिका घेतली.

दरम्यान संतप्त झालेल्या अंजलीच्या नातेवाईकांनी अंजलीच्या अंत्यविधी तिच्या सासरच्या दारातच करणार अशी भूमिका घेतली. अनेकांनी या भूमिकेला विरोध केला मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी घरासमोर चिता रचून मुलीवर अंत्यसंस्कार केले. दोन दिवसांपूर्वी अंजलीचा शवविच्छेदन अहवाल आला असून विहिरीत टाकण्यापूर्वी तिचा खून केला असल्याची बाब समोर आली आहे. या खून प्रकरणी अंजलीचा नवरा, सासू सासरे, नणंद, जावई आदी सहा जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.