सोलापूर प्राथमिकचा लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूरचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना आज सायंकाळी 25 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. या कारवाईत आणखी एका कर्मचाऱयाचा सहभाग असल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये सुरू होती. याबाबत एका संस्थाचालकाने तक्रार दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

कालच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लाचखोर शिक्षणाधिकारी लोहार यांचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. पुरस्कार मिळाल्याच्या दुसऱयाच दिवशी कारवाई झाल्याने शिक्षणक्षेत्रात चर्चा रंगली आहे. 13 महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाचा शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी पदभार घेतला होता. पदभार घेतल्यापासून ते वादग्रस्त होते. त्यांच्याविषयी मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे तक्रारही करण्यात आली होती. त्यांची कोल्हापुरात असताना केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशीही चालू आहे.

सोलापुरात एका स्वयंअर्थसाहाय्य शाळेने 5वी ते 8वीचे वर्ग वाढविण्यासाठी परवानगी अर्ज शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे दिला होता. या परवानगीसाठी व शाळेला आय. डी. क्रमांक देण्यासाठी लोहार यांनी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. दिवाळीची सुट्टी सुरू असल्याने रक्कम देण्यास विलंब झाला होता. दरम्यान, शाळेच्या संस्थाचालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

आज सायंकाळी कार्यालय बंद होण्यावेळी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना ताब्यात घेतले. चौकशीसाठी त्यांना घेऊन जात असताना जिल्हा परिषदेत कारवाईचे बिंग फुटताच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत किरण लोहार यांची चौकशी सुरू होती. लोहार यांची 13 महिन्यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरलेली असताना आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळविणारे डिसले गुरुजी प्रकरणात त्यांची भूमिका व अहवाल संशयास्पद ठरल्याने ते टिकेचे धनी ठरले होते.