नुसता अभ्यास करत बसणार नाही! कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही!!

आमचे सरकार केवळ घोषणा करणारे नाही, घोषणा करणारे सरकार गेले आहे. आम्ही निश्चित शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. नुसता अभ्यास करत बसणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या सोलापूर जिह्याचा झंझावाती दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. या अस्मानी संकटात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना 4 लाख आणि नुकसानग्रस्त शेतकऱयाला मुख्यमंत्र्यांनी 25 हजार रुपयांच्या तातडीच्या मदतीचे ‘ऑन द स्पॉट’ वाटप केले. राज्यात अतिवृष्टीचा धोका टळलेला नाही. तुम्ही सुरक्षित रहा, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा धीरही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेतकऱयांना दिला.

परतीच्या मुसळधार पावसाने फटका बसलेल्या सोलापूर जिह्याचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द, सांगवी बुद्रूक, रामपूर, बोरी उमरगे या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. शेतकऱयांशी संवाद साधून आस्थेवाईकपणे चौकशी करून धीर दिला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर येथे आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोकणाला निसर्ग वादळाचा फटका बसला होता. मधल्या काळात विदर्भालाही फटका बसला. आता परतीच्या पावसाचा तडाखा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडय़ाला बसला आहे. मी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सोलापूर जिह्यातील स्थितीचा आढावा वेळोवेळी घेत होतो. सोमवारी प्रत्यक्षात पाहणी करून सरकारच्या वतीने मदत देण्याचे काम करण्यासाठी आलो आहे. यानंतर आता मराठवाडय़ाचा पाहणी दौरा करणार आहे.

राज्यातील शेतकऱयांवर मोठे संकट आले आहे. त्याची जाणीव ठेवून मदत करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्यातील मंत्री अनेक भागांत जाऊन माहिती घेत आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. परतीच्या पावसाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे योग्य होणार नाही. आमचे सरकार केवळ घोषणा करणारे नाही, घोषणा करणारे सरकार गेले आहे. नुसता अभ्यास करत बसणार नाही, आम्ही निश्चितच शेतकऱयांना मदत करू. शेतकऱयांना वाऱयावर सोडणार नाही, असा शब्दच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

अतिवृष्टीचे संकट टळलेले नाही, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी

राज्यावरील अतिवृष्टीचे संकट टळलेले नाही. येत्या काही दिवसांत आणखी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, तसा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱयांनी आपले पशुधन आणि स्वतः सुरक्षित राहावे. कोणत्याही भागात जीवितहानी होणार नाही, यासाठी तत्काळ यंत्रणा पोहोचविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, स्वतःला जपा, सुरक्षित ठिकाणी रहा; सरकार तुमच्यासोबत आहे, असा धीर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

‘उजनी’च्या विसर्गाची चौकशी करू

उजनी धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीपातळी वाढली. त्यानंतर विसर्ग वाढविण्यात आला, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, याबाबत प्रत्यक्ष चौकशी करून याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल.

मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत

अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी चार लाख रुपयांच्या धनादेशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मदत देण्यात आली. यामध्ये पंढरपुरातील चार, माढा तालुक्यातील तीन, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि बार्शी तालुक्यांतील एका मृतांच्या नातेवाईकांना हे धनादेश देण्यात आले.

नुकसानग्रस्त शेतकऱयांना धनादेशाचे वाटप

या दौऱयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी रमेश बिराजदार, लक्ष्मण कोनदे, शोभा बिराजदार, नागेंद्र बिराजदार, चन्नव्वा वाघमारे यांना प्रातिनिधिक स्वरूपात 25 हजार रुपयांच्या धनादेशांचे वाटप केले.

बोरी नदीवरील पुलावर शेतकऱयांची आस्थेवाईकपणे विचारपूस

सांगवी खुर्द आणि सांगवी बुदुक या गावांना जोडणाऱया पुलावरून मुख्यमंत्र्यांनी पुराची पाहणी केली. गावकऱयांशी त्यांनी संवाद साधला. शासन खंबीर असून, नुकसानभरपाई मिळणार आहे. या संकटाशी सामना करताना गावकऱयांनी धीर सोडू नये, जीवाचे बरे-वाईट करून घेऊ नये, असा दिलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. गावकऱयांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

बिहारला जाणारच आहात तर दिल्लीलाही जाऊन या; पंतप्रधान बाहेर पडतील

बिहारला जाऊन निवडणूक प्रचार करण्यापेक्षा दिल्लीला जाऊन शेतकऱयांसाठी मदत मागा. दिल्लीला जाऊन या, पंतप्रधानही बाहेर पडतील, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. राज्यातील शेतकरी अडचणीत असताना कोणीही राजकारण करू नये, कोणीच राजकीय चिखलफेक करू नये. मलाही ते करायचे नाही. शेतकऱयांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मिळून दिलासा देण्याचे काम केले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले.

पंतप्रधान मोदींचा पह्न; मदतीचे आश्वासन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी पह्न आला होता. त्यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱयांना मदतीचे आश्वासन दिले आहे. केंद्राकडे मदत मागण्यास गैर काय आहे. मोदी सरकार परदेशातील नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री बुधवारी धाराशीवमध्ये

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार 21 ऑक्टोबरला धाराशीव जिह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱयात मुख्यमंत्री जिह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील, तसेच प्रत्यक्ष शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधतील.

केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली, तर मदत मागावी लागणार नाही!

केंद्र सरकारने राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडे मदत मागावी लागणार नाही. मला यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आणायचे नाही. शेतकऱयांना वाऱयावर सोडणार नाही, नाराज करणार नाही. हे सरकार तुमचे आहे, शेतकऱयांचे सरकार आहे. त्यामुळे आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या