
उत्तर सोलापूर तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या 194 सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीतील मतांची मोजणी सोमवारी घेण्यात आली. यात तिऱहे, तेलगाव, कोंडी, गुळवंची, भोगाव, सेवालालनगर, एकरूख तरटगाव या सात ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
माढा तालुक्यातील 84 ग्रामपंचायतींच्या निवडणुकी पैकी 8 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 72 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी पार पडली. तालुक्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहिला असून, 12 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे, तर काँग्रेस आणि भाजपला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही. यंदा 25 ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन झाले आहे. वाकाव, उंदरगाव, माळेगाव, बुद्रुकवादी, गराकोले, रुई, नागोर्ली, शेवरे, घोटी, अकोले बुद्रुकवादी, अहेरगाव या गावांतील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील 62 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी झाली. 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी विधानसभा मतदारसंघातील 89 पैकी 61 ग्रामपंचायती काँग्रेसकडे असल्याचा दावा व्यक्त केला आहे, तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी 89 पैकी 55 ग्रामपंचायतींवर भाजपाने यश प्राप्त केल्याचे म्हटले आहे.
करमाळा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींपैकी 49 ग्रामपंचायत मतदानाचे निकाल आज हाती आले. त्यापैकी सालसे व जेऊरवाडी या दोन ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. आज झालेल्या निकालांमध्ये 18 ग्रामपंचायतींमध्ये आमदार संजय शिंदे यांच्या गटाने वर्चस्व मिळविले आहे. उमरड, सावडी, जातेगाव, बोरगाव, वडगाव, मलवडी, नेरले, केडगाव, पांगरे, कविटगाव, करंजे, साडे, झरे, सौंदे या 20 ग्रामपंचायतींवर आमदार शिंदे यांची सत्ता येणार आहे.
मोहोळ तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यापूर्वी 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत अनेक ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन घडले आहे. राष्ट्रवादीला 55, भाजपला 7 ग्रामपंचायतींत यश मिळाले आहे. पाच ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सोमवार, 18 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. या निवडणुकीत आमदार परिचारक व दिवंगत आमदार भारत भालके गटाने वर्चस्व सिद्ध केले आहे, तर समाधान आवताडे गटानेदेखील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी वाटचाल सुरू केली आहे.