
प्रवासी जीपचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला असून, नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूरजवळील कुंभारी शिवारात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. दरम्यान, चालकाने मोबाईवर बोलत जीप भरधाव चालविल्यामुळे ही घटना घडल्याचे जखमी प्रवाशांनी सांगितले असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
जलील बागवान हा सकाळी 9.30च्या सुमारास अक्कलकोट व तालुक्यातील प्रवाशांना घेऊन सोलापूरकडे निघाला होता. या जीपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. जीप भरधाव चालवीत असताना तो सतत मोबाईलवर बोलत होता. दरम्यान, कुंभारीजवळील इंडियन पेट्रोल पंपाजवळ जीप आली असता, एका खड्डय़ात जीपचे पुढील चाक गेल्यामुळे टायर फुटून जीप उलटली. जवळपास रस्त्याच्या कडेला दोन ते तीन वेळा जीप उलटून चेंदामेंदा झाला. यात बसलेले प्रवासी कट्टव्वा बनसोडे, बसवराज बनसोडे, आनंद गायकवाड, लक्ष्मण शिंदे, सुनीता महाडकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर आनंद लोणारी यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या अपघातात नऊजण गंभीर जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, जीपचालक जलील बागवान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह हे रस्त्यावर व शेतात विखुरले गेल्याचे चित्र होते. जीपचालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शी व प्रवाशांकडून सांगण्यात आले. या अपघातात अक्कलकोट शहर व तालुक्यातील प्रवाशांचा नाहक बळी गेला असून, सर्वत्र शोककळा पसरला आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अपघातस्थळी भेट देऊन माहिती घेतली.
मृतांची नावे
कट्टव्वा यल्लप्पा बनसोडे, बसवराज यल्लप्पा बनसोडे, आनंद इरप्पा गायकवाड (रा. ब्यागेहळ्ळी, ता. अक्कलकोट), लक्ष्मण मुरलीधर शिंदे (रा. बणजगोळ), सुनीता सुनील महाडकर (रा. दोडय़ाळ) हे जागीच ठार झाले, तर आनंद युवराज लोणारी (रा. अक्कलकोट) या शिक्षकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
जखमींची नावे
अक्षय लक्ष्मण शिंदे (रा. बणजगोळ), समर्थ प्रशांत अनंत (रा. फत्तेसिंह चौक), विशाल दगडू गोरसे (रा. समतानगर), गुरुराज रवींद्र वांझरे (रा. बुधवार पेठ), सैपन इब्राहिम वाडीकर (रा. गौडगाव), रमाबाई यल्लप्पा बनसोडे, विशाल यल्लप्पा बनसोडे (रा. भीमनगर), निजाम हनिफ मुल्ला (रा. वागदरी), निसार अमशेद्दीन पीरजादे (बुऱहाणपूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यांतील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जीपचालक जलील नजीर बागवान (रा. म्हेत्रेनगर, अक्कलकोट) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.






















































