वाढत्या ‘एनपीए’मुळे सोलापुरातील लक्ष्मी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त, रिझर्व्ह बँकेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यातील जुनी बँक असलेली लक्ष्मी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, सहकार विभागाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. आर्थिक घरघर लागल्याने रिझर्व्ह बँकेने कारवाई केली होती. शहर उपनिबंधक नागनाथ केजेरी यांनी प्रशासक म्हणून पदभार घेतला आहे.

सोलापुरातील शतकपूर्ती दि लक्ष्मी सहकारी बँकेला आर्थिक घरघर लागली असून, बड्या कर्जदारांनी रक्कम थकविल्याने एनपीएत वाढ झाली. यामुळे रिझर्व्ह बँकेने कारवाई केली होती. कारवाई सुरू असतानाच सहकार खात्यानेही दखल घेत संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासन मंडळ नेमले. यात दोन सदस्य आहेत. शहर उपनिबंधक नागनाथ केजेरी यांनी प्रशासन मंडळाचे अध्यक्ष म्हणून पदभार घेतला आहे, तर दक्षिण सोलापूर तालुक्याचे उपनिबंधक अमर झालटे सदस्य आहेत.

बँकेत 224 कोटी रुपयांच्या ठेवी असून, 200 कोटींच्या रकमांना विमापात्र आहेत. या कारवाईमुळे सहकार कायदा 1960च्या कलम 88 नुसार चौकशी होणार आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादत 6 महिन्यांचा कालावधी सुधारण्यासाठी दिला आहे. अनेक ठेवीदार गेल्या महिनाभरापासून ठेवीच्या रकमा घेण्यासाठी बँकेच्या शाखेत गर्दी करत होते. काही उद्योजक व व्यापाऱ्य़ांनी रक्कम थकविल्याने बँकेची आर्थिक स्थिती ढासळत होती.

5 लाखांच्या आतील ठेवीदारांची यादी बनवून त्यांचे दावे दाखल करण्याची प्रक्रिया प्रशासक मंडळाचे अध्यक्ष शहर उपनिबंधक नागनाथ केजेरी करत असून, संचालक मंडळावर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.