झाडं वाचवा…झाडं जगवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नमिता वारणकर,[email protected]

सोलापुरातील आकुंभे गावातील तंत्रस्नेही शिक्षक रणजितसिंह देसले यांनी गावातील वृक्षतोड थांबवण्यासाठी आणि त्यांची वाढ होण्यासाठी आधुनिक क्यू आर कोड टॅग प्रणालीचा शोध लावलाय. उद्याचे भावी  नागरिक असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीनेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत ते जनजागृती करत आहेत. या अभिनव संकल्पनेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘इनोव्हेटिव्ह एज्युकेटर’ हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.

आकुंभे गाव 1100 हेक्टरवर वसलं आहे. 486 झाडं या गावात आहेत. यातील प्रत्येक झाडाचं वर्गीकरण क्यू आर कोड टॅग प्रणालीकरिता केलं गेलं. त्यामध्ये झाडाचं वय, त्यापासून मिळणारा ऑक्सिजन, फळ आणि सावली यानुसार प्रत्येक झाडावर वर्गीकरणाप्रमाणे स्टिकर लावण्यात आलं. ए म्हणजे शून्य ते दोन वर्षे वयोगटातली झाडं, बी म्हणजे दोन ते सात वर्षे, सीमध्ये सात ते पंधरापर्यंत आणि डी म्हणजे किमान 20 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असलेली झाडे. जी तोडता येत नाही. त्याप्रमाणे प्रत्येक झाडाच्या बुंध्यावर ए, बी, सी, डीचं स्टिकर लावलं आहे. त्याखाली त्याचा क्यूआर कोड टॅग आहे. झाड तोडायच्या वेळी त्याचा क्यू आर कोड टॅग स्कॅन केला की, ज्याने ते दत्तक घेतलं आहे त्याला अलर्ट जातो. आणि ज्याने ते झाड दत्तक घेतलंय ती व्यक्ती किंवा विद्यार्थी झाड तोडणाऱया व्यक्तीला पाच झाडं दत्तक देतो, अशी ही अनोखी संकल्पना आहे.

जैवविविधता आणि पर्यावरण संशोधन याकरिता शाळांसाठी असलेल्या  ‘अराउंड द वर्ल्ड’ या पर्यावरण संरक्षणविषयक प्रकल्पाबाबत प्रयोगशील शिक्षक रणजितसिंह देसले सांगतात,  या प्रकल्पाअंतर्गत गावात 26 टक्के असलेलं वनक्षेत्र 33 टक्के करणं हे आमचं ध्येय होतं. त्यासाठी झाडाचं रक्षण करणं आणि जास्तीत जास्त झाडं लावता येतील यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. हा वापरही गावकऱयांना सहज जमणारा सोपा असावा यावरही विचार केला. त्याप्रमाणे क्यू आर कोड ही अतिशय साधी सोपी प्रणाली शोधून काढण्यात यश आलं. या संकल्पनेद्वारे  पालक आणि मुलांना त्यांनी दत्तक घेतलेली झाडे तोडण्याबाबत जागरूक राहणं सोपं जाईल. ही पद्धत अतिशय सोपी असून त्यासाठी फार मोठं तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण घेण्याची गरज नाही.

याकरिता झाडं तोडण्यामागची कारणंही विचारात घेतली गेली. त्याबाबत गावातील लोकांशी चर्चा केल्यावर त्यांनी होकार दिला. म्हणजे वृक्षतोड, वृक्षबंदी याऐवजी त्यांचं मतपरिवर्तन कसं होईल यादृष्टीने विचार केला. याची जबाबदारी शाळेतील विद्यार्थ्यांना दिली. त्यामुळे मुलंच आपल्या पालकांना झाडाचं महत्त्व पटवून देऊ लागली. यासाठी तंत्रज्ञानात मुलांचा आणि पालकांचा सहभाग घडवून आणण्यात त्यांना यश आलं. यासाठी  पालकांचं प्रबोधन करण्याबाबत अडचणी आल्या तरी मुलांमध्येच पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण केल्याने त्यांनी आपल्या कुटुंबाला याबाबतीत सजग केलं, अशी माहिती ते देतात.

वृक्षतोडीला आळा बसेल का?

या प्रणालीमुळे वृक्षतोडीला आळा बसेल असं तुम्हाला वाटतंय का, यावर त्यांचे म्हणणे आहे की, निश्चितच… सध्या तरी आळा बसतोय.  हळूहळू मात्र कायमस्वरूपी बदल अपेक्षित होता. ठरवलेलं ध्येय दरवर्षी फक्त एक टक्क्याने वाढवायचं आहे. यामध्ये किती झाडं वाढतात आणि किती तोडली जाऊ शकतात हेही पाहायचं आहे. झाडावरचा टॅग बघितल्यामुळे ते तोडणाऱयालाही आपण झाडांचं किती नुकसान करत आहोत हे कळतं. तोडणाराही विचार करतो की, खरंच मी झाड तोडू का? कारण झाड तोडणाऱयाला त्या झाडाचं महत्त्वच माहीत नाही असंही होऊ शकतं. गुन्हे दाखल करणं, योजना राबवणं यापेक्षा वृक्षतोड करणाऱयाला त्याची जाणीव होऊ द्या की, ते पर्यावरणाचं किती नुकसान करत आहेत. बंधने लादून नियम पाळायला लावले तर त्यांच्याकडून त्याचं पालन होऊ शकत नाही, याकरिता या प्रणालीचा वापर केला आहे.