
सोलापूर महापालिकेतील भाजप नगरसेवकांत फूट पडली असून, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी सभागृहनेता सुरेश पाटील यांना महापौर श्रीकांचना यन्नम यांनी निलंबित केल्यानंतर भाजपचे आजी-माजी सभागृहनेत्यांनी पेढे वाटून जल्लोष केला आहे. सोलापूर महापालिकेच्या इतिहासात महापौरांनी स्वपक्षातीलच ज्येष्ठ नगरसेवकाला निलंबित करण्याची ही पहिलीच घटना आहे. स्वपक्षातीलच ज्येष्ठ नगरसेवकाला निलंबित केल्यानंतर भाजपच्या आजी-माजी सभागृहनेत्यांनी पेढे वाटून, तर नगरसेवकांनी बाके वाजवून आनंद साजरा केला.
महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत धोंगडेवस्ती परिसरात अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईमुळे भाजप सदस्यांमध्ये वाद सुरू झाला. भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी प्रभागातील अतिक्रमण हटविण्यासंबंधी पत्र दिले होते. या प्रभागातील भाजपच्या नगरसेविका अंबिका पाटील यांनी अतिक्रमण पाडू नये म्हणून पत्र दिले होते. यावरून सभागृहात भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक पाटील यांनी रणकंदन माजविले. सुरेश पाटील यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या भूमिकेचा तीक्र निषेध करीत जातीयवादाचा आरोप केला. यामुळे भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास करली यांनी सुरेश पाटील यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला विद्यमान सभागृहनेते शिवानंद पाटील व त्यांच्या समर्थकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे सुरेश पाटील यांनी सभागृहातच पुन्हा एकदा माइक फोडला.
यावेळी काँग्रेसच्या नगरसेविकेने त्यांच्या हातातील माइक काढून घेण्याचा प्रयत्न केला. अपमानित झालेले सुरेश पाटील महापौर यन्नम यांच्या डायससमोर जाऊन निषेध नोंदवत असताना त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौर यन्नम यांनी पाटील यांना एक दिवसासाठी निलंबित केले. गोंधळ अधिकच वाढल्याने पोलिसांना पाचारण करून सुरेश पाटील यांना सभागृहाबाहेर नेण्यात आले. दरम्यान, ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निलंबनानंतर सभागृहातच बर्फी व पेढे मागविण्यात आले. सभागृहनेते शिवानंद पाटील यांच्या डायसवर ठेवून पेढे वाटण्यात आले. ‘एमआयएम’चे नगरसेवक रियाज खैरदी यांनी भाजपचे माजी सभागृहनेता श्रीनिवास यांना पेढे भरविले, तर करली यांनी खैरदी यांना पेढे भरवत आनंद साजरा केला.



























































