मल्टिप्लेक्समध्ये सुरू केले कोविड हॉस्पिटल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिह्यात दररोज कोरोनाचे शेकडो रुग्ण आढळत आहेत. यात प्रामुख्याने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाग्रस्तांच्या या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. रुग्णांना रुग्णालय आणि बेडची कमतरता भासत असल्याने त्यांची जीवघेणी पळापळ सुरू आहे. ही विदारक परिस्थिती पाहून धाराशीव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी माणुसकी जपत स्वतःच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये स्वखर्चाने कोविड हॉस्पिटल उभारले आहे. या हॉस्पिटलमध्ये 50 रुग्णांना ऑक्सिजनसह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यांत कोरोनामुळे स्थिती गंभीर बनली आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी अधिक रुग्णालये उभारणीची गरज निर्माण झाली असताना उद्योजक अभिजित पाटील यांनी त्यांच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये कोविड हॉस्पिटल उभारून ‘आदर्श’ निर्माण केला आहे.