
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पालिका आयुक्तांनी नेमून दिलेल्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी सहायक कामगार आयुक्त नीलेश लक्ष्मण यलगुंडे यांच्याविरुद्ध महापालिकेने न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. कणकदंडे यांनी प्रोसेस इश्यूचा आदेश दिला आहे.
सोलापुरात शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढलेला असताना नियंत्रणात आणण्यासाठी शासन निर्णय व मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सहायक कामगार आयुक्त यलगुंडे यांची प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नियुक्ती केली होती.
सर्वेक्षणाच्या कामकाजावर देखरेख करण्याची जबाबदारी सोपविलेली असताना त्यांनी टाळाटाळ केली होती. याप्रकरणी मनपा आयुक्तांनी त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. यलगुडे यांनी केलेला खुलासा सबळ न वाटल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी न्यायालयामध्ये खासगी फिर्याद दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन यलगुंडेविरुद्ध प्रोसेस इश्यूचा आदेश दिला. यात ऍड. नीलेश दत्तात्रय जोशी यांनी काम पाहिले.

































































