
उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे आता शाळांना सुट्ट्या लागल्याने शाळकरी मुले पोहण्यासाठी विहिरीत उतरली. मात्र यादरम्यान दगडी विहिरीचा कठडा कोसळल्याने दोन मुलं ढिगाऱ्याखाली दबली. तिघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे. सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील बोरामणी गावात ही घटना घडली. नैतिक सोमनाथ माने आणि संघराज हरिबा राजगुरू अशी ढिगाऱ्याखाली दबलेल्या मुलांची नावे आहेत.
नैतिक, संघराज यांच्यासह अन्य तीन मुलं बोरामणी गावच्या शिवारात असलेल्या दत्तात्रय शेळके यांच्या विहिरीत पोहायला गेली होती. ही विहिर 35 ते 40 फूट खोल आहे. सर्वजण पोहण्याचा आनंद लुटत असतानाच विहिरीच्या एका बाजूचा दगडी कठडा कोसळला. यावेळी त्या बाजूला पोहत असलेले नैतिक आणि संघराज हे ढिगाऱ्याखाली अडकले. अन्य तिघेजण दुसऱ्या बाजूला पोहत असल्याने बचावले.
विहिरीचा कठडा कोसळल्यानंतर शेतातील ग्रामस्थांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या शेतातील लोकंही धावत आले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. अग्नीशमन दल आणि पोलिसांकडून ढिगाऱ्याखाली दबलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.