
वीजबिलाची थकबाकी न भरणाऱ्य़ा ग्राहकांकिरुद्ध महावितरण प्रशासनाने कारवाई तीव्र केली आहे. या अंतर्गत सोलापूर शहरातील जकळपास 9 हजार ग्राहकांची वीज कनेक्शन तोडण्यात आल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली.
जून महिन्याच्या सुरुवातीला शहरात जवळपास 1 लाख 12 हजार 617 ग्राहकांकडे 53 कोटी 44 लाख थकबाकी होती. त्यामुळे महावितरण प्रशासनाने शहरात थकीत वसुली मोहीम तीव्र केली. त्यामुळे एका महिन्यात जवळपास 9 हजार 92 ग्राहकांची वीज खंडित करून त्यांच्याकडून 10 कोटी 80 लाख रुपये वसूल करण्यात आले; मात्र आता 91 हजार 437 ग्राहकांकडे 44 कोटी 49 लाख रुपये अद्यापही थकबाकी असल्याचे प्रशासनाने सांगितले, तर 1 हजार 482 ग्राहकांची वीज पुन्हा जोडण्यात आली आहे.
ग्राहकांनी महावितरणच्या आवाहनानुसार थकबाकी भरली आहे; परंतु ज्या ग्राहकांनी पैसे भरले नाही त्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वीजबिल थकबाकीदार ग्राहकांनी आपणाकडे असलेली थकबाकी भरून महावितरण प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.
वीजबिलाच्या थकबाकीत दिवसेंदिवस काढ होत आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाचे कर्मचारी थकबाकी वसूल करण्यासाठी विविध भागात जात आहेत. मात्र, त्या कर्मचाऱ्य़ांना थकबाकीदारांकडून वीजपुरवठा खंडित करीत असताना शिवीगाळ आणि मारहाणीचे प्रकार घडत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ग्राहकांनी आपली थकबाकी भरून महावितरण प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




























































