सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत निर्बंध शिथिल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्यात सध्या विचित्र स्थिती निर्माण झाली असून, पाच तालुक्यांत कडक निर्बंध असताना सहा तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण अत्यंत कमी असल्याने शिथिलता देण्यात आली आहे. या संबंधीचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज काढला आहे. मॉल, हॉटेल, दुकाने रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास, 24 तास पार्सल सेवा, तर प्रांगणात किंवा लॉनवरील विवाह सोहळ्यास 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. यात अक्कलकोट, मंगळवेढा, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी पंढरपूर, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस या पाच तालुक्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे 13 ऑगस्टपासून या पाचही तालुक्यांत कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अक्कलकोट, मंगळवेढा, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज या सहा तालुक्यांसाठी स्वतंत्रपणे आदेश काढत शिथिलता दिली आहे.

खुले अथवा बंदिस्त उपहारगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यासह रात्री दहापर्यंत हॉटेल, बार सुरू ठेवण्याबरोबरच 24 तास पार्सल सेवा देण्यासाठी परवानगी दिली आहे. शॉपिंग, मॉल, दुकाने रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास शिथिलता दिली असून, लसीकरण प्रमाणपत्र व ओळखपत्र सक्तीचे केले आहे. खासगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी 24 तास सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये होणाऱया विवाह सोहळ्यात उपस्थितांची संख्या 200, तर बंदिस्त मंगल कार्यालय हॉटेलमधील विवाह सोहळ्यासाठी उपस्थिती संख्या 100 व्यक्तींची मर्यादा देण्यात आली आहे. सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स, नाटय़गृहे, धार्मिक स्थळे बंद राहतील. जिल्हाधिकाऱयांच्या या नव्या आदेशामुळे रुग्णसंख्या कमी झालेल्या सहा तालुक्यांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पाच तालुक्यांमध्ये चार हजारांवर ऑक्टिव्ह रुग्ण

शहर वगळता जिल्ह्यात सध्या 4984 रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यात सहा तालुक्यांमधील केवळ 645 रुग्ण आहेत, तर संचारबंदी घोषित केलेल्या पाच तालुक्यांमधील 4 हजार 339 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, शहरात 63 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.