
वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या वेगवान प्रयत्नांना यश येत आहे. त्यानुसार सोलापूर येथील एनटीपीसी वीजनिर्मिती केंद्राकडून आणखी 525 मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे. विजेची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने एनटीपीसीच्या सोलापूर, मौदा व गदरवारा या वीजनिर्मिती कंपन्यांकडून 673 मेगावॅटचा अतिरिक्त कोटा उपलब्ध करून घेतला आहे.
सोलापूर वीजनिर्मिती केंद्रातील संच क्रमांक दोन तांत्रिक कारणास्तव बंद झाल्याने जवळपास 525 मेगावॅटची वीज कमी मिळत होती. महावितरणने एनटीपीसीसोबत संपर्क साधून दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्यासाठी पाठपुरावा केला. सध्या हा संज दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित झाल्याने या संचामधून 525 मेगॉवट विजेची उपलब्धता झाली आहे. मागील दोन दिवसांपासून खुल्या बाजारामधून महावितरणकडून 1 हजार 500 ते 2 हजार मेगावॅट विजेची खरेदी करण्यात येत असल्यामुळे राज्यात भारनियमन झाले नाही.
रतन इंडिया 1 हजार 200 मेगावॅट, साई वर्धा 240 मेगावॅट व जीएमआर, वरोरा 200 मेगावॅट यांच्याकडून वीजकरारानुसार वीज उपलब्ध होत आहे. महानिर्मितीकडून करारात 9 हजार 540 मेगावॅट औष्णिक क्षमतेपैकी 6 हजार 800 ते 7 हजार मेगावॅट, तसेच एनटीपीसीकडून करारात 5 हजार 732 मेगावॅटपैकी 4 हजार 400 मेगावॅट इतकी वीज उपलब्ध होत आहे. महानिर्मिती व एनटीपीसीसोबत करारात क्षमतेप्रमाणे वीज उपलब्ध होण्याकरितादेखील महावितरणकडून सतत पाठपुरावा करण्यात येत आहे.



























































