
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च 2020पासून मध्य रेल्वे सोलापूर विभागातील रद्द करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली जाणार असल्याची माहिती सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेने मार्च 2020पासून प्रवासी गाड्या रद्द केल्या होत्या. मध्य रेल्वे सोलापूर विभागातील अनेक प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने काही एक्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार काही प्रवासी रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र, पॅसेंजर गाड्या सुरू करण्यास परवानगी दिली नसल्याने या गाड्या सुरू झाल्या नाहीत.
मार्च 2021मध्ये पुन्हा कोरोना संसर्गात वाढ झाल्याने सुरू करण्यात आलेल्या एक्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. जून 2021नंतर कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने पुन्हा काही एक्प्रेस गाड्या सुरू झाल्या. मात्र, पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या नाहीत. राज्य शासनाची परवानगी नसल्याने या गाड्या सुरू करण्यात आल्या नाहीत.
कोरोनाचा संसर्ग बऱयापैकी कमी झाल्याने ऑक्टोबर 2021नंतर सर्वच एक्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र, पॅसेंजर गाड्या अद्यापि सुरू झाल्या नाहीत. सोलापूर विभागातून पंचवीसच्या आसपास पॅसेंजर गाड्या धावतात. या गाड्यांमधून मोठय़ा प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे पॅसेंजर गाड्या सुरू होणे गरजेचे होते. दक्षिण, पश्चिम रेल्वे विभागाने पॅसेंजर गाड्या सुरू केल्या आहेत. त्याप्रमाणे सोलापूर विभागातील पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानंतर रेल्वेने राज्य सरकारकडे पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला असून, राज्य सरकारनेही काही अटींवर पॅसेंजर गाड्या सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच पॅसेंजर गाड्यांतून प्रवासासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे पॅसेंजर गाड्यांतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कोरोनाच्या दोन्ही लसी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासन योग्य ते नियोजन करीत असून, राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करीत लवकरच काही प्रमुख मार्गांवरील पॅसेंजर गाड्या सुरू होतील, अशी माहिती वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली आहे.


























































