
मराठा आरक्षणावरून सोलापुरातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून, आज रेल्वे रुळावर पेटते टायर टाकून रेले रोको आंदोलन केले, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयास टाळे ठोकले. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग सायंकाळी बंद केला. आमदार सुभाष देशमुख यांच्या घराला महिलांनी घेराव घालत जाब विचारला. रुपाभवानी मंदिरात मनोज जरांगे-पाटील यांच्यासाठी महाआरती करण्यात आली. दरम्यान, मोहोळ, माढा, करमाळा, बार्शीत तीक्र आंदोलन झाले. पंढरपुरात एका तरुणाने आत्महत्या केली असून, बार्शीत आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे.
सोलापुरात आज पुण्याहून आलेली रेल्वे शेटे वस्तीजवळ असता मराठा आंदोलकांनी रुळावर पेटते टायर टाकले. तसेच रेल्वे आडवून धरली. जवळपास तासभर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेवर चढून घोषणाबाजी केली. यामुळे सोलापूरकडे येणाऱया रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले, तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकत ठिय्या आंदोलन केले. या वेळी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, राम जाधव, कोल्हे, शिंदे यांच्यासह शेकडो आंदोलनकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, या आंदोलनानंतर होटगी रोडवरील भाजपचे आमदार, माजीमंत्री सुभाष देशमुख यांच्या घराला घेराव घालून ‘जबाब दो’ आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी महिला मोठय़ा संख्येने जमलेल्या होत्या. सुभाष देशमुखांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, आंदोलनात सहभागी व्हावे, असे सांगत आगामी निवडणुकीत धडा शिकवू, असा इशारा दिला.
सोलापुरात उपोषणास बसलेले विष्णू पवार व सोमनाथ राऊत यांची प्रकृती खालावली आहे. सायंकाळी आंदोलनकर्त्यांनी सोलापूर-पुणे महामार्गावरील बाळे येथे रस्त्यावर टायर पेटवून वाहतूक बंद केली. त्यामुळे दोन्ही बाजूला दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प झाली असून, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एसटी बससेवा कोलमडली
या आंदोलनामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी एसटी बसला लक्ष्य केले. त्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सोलापूर आगारातून 450 एसटी बसेसची वाहतूक होते. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणातूनही एसटी बसची वाहतूक सेवा असून, सध्या बाहेरून येणाऱ्या बसेसही बंद झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे दिसून आले.
नेत्यांच्या फोटोला शेण फासले
अकलूज : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱया गुणरत्न सदावर्ते, छगन भुजबळ, नारायण राणे, रामदास कदम, सदाभाऊ खोत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोंना अकलूजमधील महर्षी चौकामध्ये मराठा आंदोलकांनी शेण फासले. यावेळी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, सोशल मीडियावर महाराष्ट्र बंदची पोस्ट सध्या जोरात फिरत आहे. मराठा समाजाकडून अद्याप महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली नसली तरी या पोस्टमुळे आज अकलूजमधील बस वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.
माढय़ात मोर्चा
माढा: मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ माढा शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जगदाळे मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात केली, तेथून मोर्चा तहसील कार्यालयावर गेला. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. माढाचे तहसीलदार विनोद रनवरे यांना विद्यार्थिनींच्या हस्ते निवेदन देण्यात आले. दरम्यान, करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावाने राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे.






























































