
सोलापूर, दि सोलापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचे अंशतः खासगीकरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तथा प्रशासक पी. शिवशंकर यांनी घेतला आहे. त्याची निविदा पुढच्या आठवडय़ात निघणार आहे.
सोलापूर परिवहन उपक्रम तोटय़ात आहे. तो काही केल्या फायद्यात येत नाही. त्यामुळे यापूर्वी महापालिका सभागृहाने खासगीकरण करण्याचा ठराव केला होता. खासगीकरणाविषयी माहिती देताना आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, ‘शहरातील बससेवेच्या मार्गांची यादी करून त्याचे चार भाग केले जाणार आहेत. या चार भागांपैकी एक भाग महापालिका परिवहन विभागासाठी ठेवणार आहे. त्या भागावर परिहन विभागाकडे जेवढय़ा बसगाडय़ा आणि कर्मचारी आहेत तेथे ते काम करतील. उर्वरित तीन भागांचे खासगीकरण केले जाणार आहे. खासगीकरण केले तरी प्रवासाचे तिकीट दर महापालिकाच ठरवणार आहे. त्यामुळे प्रवाशांची लूट होणार नाही. बसगाडय़ांमुळे प्रवाशांना कमी पैशांत प्रवास मिळेल. खासगीकरण केल्यानंतर वेळेवर आणि सुरळीत बससेवा मिळणे गरजेचे आहे’, असेही आयुक्तांनी सांगितले.
चांगला अधिकारी मिळाला, तर परिवहन उपक्रम नीट चालतो आणि नफ्यात येतो, हा अनुभव सोलापूरकरांनी घेतला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून राजेंद्र मदने 2009 ते 2010 पर्यंत सोलापुरात कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्याकडे परिवहन व्यवस्थापकाची जबाबदारी होती. त्यांनी शहरातील विनापरवाना रिक्षांवर कडक कारवाई केली. त्यामुळे अशा रिक्षांची संख्या कमी झाली आणि प्रवासीसंख्या महापालिकेच्या बसमध्ये काढली. त्यामुळे त्यांच्या काळात परिवहनला ऊर्जितावस्था प्राप्त झाली होती. या नंतरच्या काळात मात्र परिवहन विभाग फायद्यात आलाच नाही.
शहरात 1949 मध्ये सुरू झाली बससेवा, इमारतीवर सालाची नोंद बुधवार पेठ परिसरातील बस डेपोच्या इमारतीवर 1949 तारीख लिहिली आहे. नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. यानंतर महापालिकेत परिकहनचा स्वतंत्र विभाग झाला आणि त्याची समिती स्थापन झाली. 2013 मध्ये केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत सोलापूरच्या परिवहन विभागात 144 नवीन गाडय़ा आल्या. त्यामध्ये 10 क्होल्वो, 35 मिनीबस, 99 जनबसचा समावेश होता. अवघ्या नऊ महिन्यांतच यातील 99 बसेसच्या चॅसी क्रॅक असल्याचे आढळून आले. त्यावेळी साधारण 2015 ते 2016 च्या दरम्यान सुमारे 125 बसगाडय़ा रस्त्यावर धावत होत्या. टप्प्याटप्प्याने गाडय़ा कमी होत गेल्या.
20 बसगाडय़ा रस्त्यावर
महापालिकेच्या परिवहन विभागाच्या सध्या 20 ते 22 बस गाडय़ा रस्त्यावर धावत आहेत. यांचे दररोजचे उत्पन्न सुमारे 80 हजार रुपये आहे. या विभागांमध्ये साधारण 125 कायम कर्मचारी आहेत, तर 30 बदली कामगार आहेत.






























































