सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा पूर्ण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या सर्व परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये 99.86 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली, तर 0.14 टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिली. केवळ 133 विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणीक शहा यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून उन्हाळी 2020 अंतिम वर्ष आणि एटीकेटी तसेच बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन घेण्यात आल्या. या परीक्षेसाठी एकूण 99 हजार 970 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 5 ऑक्टोबरपासून सुरुवातीला एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात झाली. त्यानंतर 12 ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाच्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात झाली. या विद्यार्थ्यांच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. एटीकेटी व बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या काही राहिलेल्या परीक्षा लवकरच पूर्ण होतील. नियमित विद्यार्थ्यांबरोबरच एटीकेटी व बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये एकमेव विद्यापीठ आहे.

31 ऑक्टोबरपर्यंत निकाल

– सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात आल्या. अंतिम वर्षाच्या नियमित विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल मिळणार असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले आहे.

‘त्या’ विद्यार्थ्यांच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये

– प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा 1 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत
होतील. विविध कारणांमुळे पाच टक्के विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठास विनंती
केल्यास त्यांच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणीक शहा यांनी दिली.

5 ऑक्टोबरची परीक्षा शनिवारी होणार

– तांत्रिक अडचणीमुळे 5 ऑक्टोबर रोजी काही विद्यार्थ्यांची एटीकेटी आणि बॅकलॉगची परीक्षा झाली नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्यादिवशी परीक्षा देता आली नाही; तसेच ज्या विद्यार्थ्यांची त्यादिवशी परीक्षा वेळेत पूर्ण झाली नाही, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा शनिवारी (दि. 24) सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची यशस्वीरीत्या परीक्षा पूर्ण झाली आहे, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची गरज नाही. यशस्वीरीत्या परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांचे लॉगिन होणार नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या