
सोलापूर शहरात टी-20 वर्ल्ड कपच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड फायनल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱया आठजणांना पोलिसांनी अटक केली असून, सुमारे 15 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भवानी पेठ व मोदीखाना येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
सचिन कमलापुरे, मुकुंद कमलापुरे (रा. साखरपेठ), दत्तात्रय पिरप्पा बडगंजी (रा. वैष्णवीनगर), चन्नप्पा सिद्धप्पा पुराणिक (रा. न्यू पाच्छा पेठ), श्रीनिवास मुरली चिता (रा. पिट्टानगर), सतीश श्रीनिवास मंगलपल्ली (रा. राघवेंद्रनगर) व रुमान सादिक शेख (रा. पाचकंदीलजवळ, मोदीखाना), संदीप ज्ञानेश्वर अंकुश (रा. वसंत विहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना टी-20 वर्ल्ड कपच्या फायनल मॅचवर भवानी पेठेत मोठय़ा प्रमाणावर सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती मिळाली. सचिन कमलापुरे व मुकुंद कमलापुरे हे दोघे भाऊ मोबाईलवरून सट्टा घेत असताना आढळले. या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता, दत्तात्रय बडगंजी, चन्नप्पा पुराणिक, श्रीनिवास चिंता, सतीश मंगलपल्ली हे साथीदारही सट्टाबाजारात सहभागी असल्याचे आढळले. त्यांच्याकडून रोकड, मोबाईल, दुचाकी व इतर साहित्य असा सुमारे चार लाख नऊ हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंके, उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने केली आहे.
दुसरी कारवाई मोदीखाना येथील पंचकंदील येथे करण्यात आली. रुमान शेख हा चारचाकी वाहनामध्ये बसून क्रिकेट सामना सुरू असताना सट्टा घेत होता, तर संदीप अंकुश हासुद्धा चारचाकी वाहनात सट्टा घेत असताना आढळला. या दोघांकडून चारचाकी वाहन, मोबाईल, रोकड, सेटटॉप बॉक्स असा 11 लाख 65 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.





























































