
‘रिंग ऑफ फायर’ अर्थात कंकणाकृत सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवण्याची उत्सुकता देशभरातील नागरिकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना होती. काळा गॉगल घालून पंतप्रधान मोदी तयारही होते. मात्र, दिल्लीतील ढगाळ वातावरणामुळे त्यांना सूर्यग्रहण पाहता आले नाही. टी.व्ही. चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे त्यांना सूर्यग्रहण बघावे लागले. याबाबत पंतप्रधानांनी फोटोसह ट्विट केले. या फोटोवरून नेटकऱयांनी थेट पंतप्रधान मोदींच्या गॉगलची किंमत दीड लाख रुपये असल्याचे शोधून काढले. अनेकांनी त्यावर ‘मीम्स’ही तयार केले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या गळ्यात लाल स्कार्फ असून, गॉगल लावून ग्रहण पाहताना ते दिसत आहेत. पंतप्रधानांच्या ट्विटवर एका नेटकाऱ्याने सर, तुमच्या ‘मीम्स’ तयार होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर मोदींनीही ट्विट करीत एन्जॉय, स्वागत आहे…, असे हजरजबाबीपणे उत्तर दिले.
मेबॅच कंपनीचा गॉगल
अनेकांनी पंतप्रधान मोदींचा गॉगल जर्मनीची प्रसिद्ध कंपनी मेबॅच आयवेअरचा असल्याचे शोधून काढले. ‘द डिप्लोमॅट वन’ प्रकारातील हा गॉगल आहे. 2159 डॉलर याची किंमत असून, हिंदुस्थानी चलनात गॉगल 154303 रुपयांचा आहे. आयात शुल्कासह गॉगलची किंमत 1 लाख 60 हजार इतकी असल्याचा शोध नेटकऱयांनी लावला आहे.
सर, हमको भी फकिरी का अनुभव करना हैं!
एका नेटकऱयाने तर सर, हमको भी फकिरी का अनुभव करना हैं… तुमच्यासारखा दीड लाख रुपयांचा मेबॅच गॉगल लावण्याची खूप इच्छा आहे, असे खोचक ट्विट केले आहे.





















































