सौर ऊर्जा वाहिनी 2.0 निविदा प्रक्रियेत बनावट बँक हमी , 122.85 कोटींची फसवणूक; चार कंपन्यांविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
₹122 Crore Fraud Exposed in Maharashtra Solar Power Tender Process signature

राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या सौर ऊर्जा वाहिनी 2.0 निविदा प्रक्रियेमध्ये बनावट बँक हमी सादर करून शासनाची तब्बल 122.85कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महावितरणकडून दिलेल्या तक्रारीवरून मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने चार कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. तसेच या कंपन्यांच्या विविध ठिकाणी असलेल्या कार्यालये व संचालकांच्या घरांवर झडती घेत कारवाईदेखील करण्यात आली आहे.

कार्यालये, घरांवर छापे

निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी मुंबई, ठाणे, नवी दिल्ली, इंदोर, मध्य प्रदेश, अहमदाबाद, गुजरात आणि राजकोट येथील पंपन्यांची कार्यालये तसेच आरोपी संचालकांच्या राहत्या ठिकाणी झडती घेऊन पंचनामे केले. या प्रकरणांमध्ये अधिक चौकशी सुरू आहे.

या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल

आर्थिक गुन्हे शाखेने नॅकॉफ ऊर्जा प्रा. लि.- एम/एस एनओपीएल प्रोजेक्टस प्रा. लि. (बँक हमी- 48.45 कोटी), एम/एस इंटिग्रेशन इडक्शन पॉवर लि.- एम/एस आयआयपीएल थ्री हिंगोली प्रा. लि., एम/एस आयआयपीएल पह्र परभणी प्रा. लि. (बँक हमी- 13.65 कोटी), एम/एस नॅकॉफ ऊर्जा प्रा. लि.- एम/एस एनओपीएल स्पेस ग्रीन एनर्जी प्रा. लि. (बँक हमी- 49. 50 कोटी), एम-एस ऑनिक्स रिनिवेबल लि.- एम/एस ऑनिक्स आयपीपी प्रा लि. (बँक हमी- 11.25 कोटी) या कंपन्या व त्यांच्या संचालकांविरोधात निर्मलनगर पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले.