सौर ऊर्जेवर चार्ज होणारा हेडफोन येतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. मोबाईल, संगणक अशा अनेक तंत्रज्ञानामध्ये सातत्याने सुधारणा होऊन नवीन तंत्रज्ञान येत असते. तसेच उद्योग क्षेत्रापासून ते रोजच्या वापरातील वस्तू सुलभतेने वापरण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. अनेक ठिकाणी रस्त्यावर सौर ऊर्जेवर चालणारे दिवे बसवण्यात आले आहेत. आता प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत जेबीएल कंपनी सौर ऊर्जेवर चार्ज होणारा हेडफोन तयार करणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहीती नुसार हे हेडफोन सौर उर्जा किंवा सेल्फ चार्जिंगवर चालणार आहेत. जानेवारी 2020 मध्ये या हेडफोनच्या निर्मितीवर काम सुरू होईल व ऑगस्टपर्यंत कंपनी त्याचे उत्पादन  सुरू करणार आहे. जेबीएलने या हेडफोन्सचे नाव रिफलेक्ट इंर्टनल असे ठेवले आहे. या हेडफोनमध्ये फक्त सोलार चार्जिंगच नसून यूएसबी फास्ट चार्जिंगची सुविधाही  देण्यात येणार आहे.  या हेडफोन्सची किंमत साडे तीन हजारापासून सात हजारापर्यंत आहे. या हेडफोनला दीड तास सौर उर्जेने चार्ज केल्यावर हे हेडफोन्स 68 तास चालणार आहेत.

हे हेडफोन 700 एमएएच सोलर पॉवर बॅटरीच्या मदतीने काम करणार आहेत. हे हेडफोन कोणत्या पद्धतीने काम करतील त्याची माहिती कंपनीने दिली आहे. उर्जेच्या रुपांतरणाच्या नियमावर हे तंत्रज्ञान काम करणार आहे. नैसर्गिक, सौर किंवा कृत्रिम उर्जेचे कधीही न सपंणाऱ्या गतीज उर्जेत रुपांतर करण्यात येणार आहे. या गतीज उर्जेवरच हे हेडफोन चालणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे हेडफोनच्या बॅटरीची क्षमता वाढणार आहे. सुमारे दीड तास सौर उर्जेवर चार्जिंग केल्यास हेडफोन 68 तास, तर दोन तास चार्जिंग केल्यास 168 तास हे हेडफोन वापरता येणार आहेत.