
मधुकर ठाकूर । उरण
केंद्र सरकारने २०२२ पर्यंत १ लाख मेगा वॅट सौर ऊर्जा निर्मितीचे महत्वाकांक्षी ध्येय निश्चित केले असून पेट्रोल आणि डिझेल सारख्या प्रदूषणकारी इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी व पर्यावरण पूरक अश्या शुद्ध ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे ठरवले असल्याची माहिती जेएनपीटी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी दिली.
जेएनपीटी आपल्या विविध इमारतींवर सौर ऊर्जेच्या पॅनेलची उभारणी करून आपल्या परीने या महत्वपूर्ण कामासाठी योगदान देत आहे. जेएनपीटी ने सौर ऊर्जेच्या पॅनेलची जेएनपीटी वसाहत व व्यावसायिक ठिकाणीच्या विविध छतावर उभारणी केली आहे. ज्यामुळे सौर ऊर्जेची निर्मिती होऊन पारंपरिक ऊर्जेवर कमीतकमी विसंबून राहता येणार आहे. यासाठी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून (नवीन आणि नूतनीकरणक्षम मंत्रालय) १५ टक्के अनुदान दिले जाते.
या प्रकल्पाची पूर्ण क्षमतेने ८२२ किलो वॅट ऊर्जा निर्मिती ची क्षमता आहे. जेएनपीटी हॉस्पिटल येथे बसविण्यात आलेल्या सौर ऊर्जा पॅनेलमधुन सर्वाधिक २.७ युनिट,प्रशासन भवनावरील पॅनेलमधुन १.७ युनिट,पोर्ट यूजर ईमारतीवरील पॅनेलमधुन – १.२ युनिट शॉपिंग कॉम्प्लेक्स व मेंटेनन्स कार्यालयावरील पॅनेलमधुन – १.०६ युनिट अशी सर्व मिळून ८.५ लाख युनिट ऊर्जेची निर्मिती वर्ष २०१७-१८ मध्ये करण्यात आली असून ज्यामुळे १.२ कोटी रुपयाची बचत मार्च २०१८ पर्यंत झाली आहे.
जेएनपीटी ने सौर ऊर्जेचे प्रकल्प सेंट मेरी विद्यालय, आय ई एस विद्यालय,पी यू बी, प्रशासन भवन, अधिकारी क्लब,स्टाफ क्लब, एम पी हॉल,शॉपिंग कॉम्प्लेक्स व मेंटेनन्स कार्यालय आणि हॉस्पिटल येथे उभारण्यात आले आहेत.
सौर ऊर्जेच्या प्रकल्पाबद्दल बोलताना जेएनपीटी अध्यक्ष नीरज बन्सल म्हणाले की, शुद्ध ऊर्जा निर्मिती करणे व प्रदूषण करणाऱ्या ऊर्जेचा वापर कमी करणे ही काळाची गरज आहे. हिंदुस्थानला पर्यायी नैसर्गिक ऊर्जा निर्मितीची महत्वाची संधी प्राप्त झाली आहे . जेएनपीटी आपल्या मर्यादित वापरासाठी अधिकतम सौर ऊर्जा निर्मितीसाठी उत्सुक असून पारंपरिक मर्यादित उर्जेवर विसंबून राहणे कमी करत असल्याचे ही नीरज बन्सल यांनी सांगितले.

































































