
जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असली तरी दिलासा देणारी बाब म्हणजे जुलै महिन्यात कोरोनाने थैमान घातलेल्या काही देशांमध्ये आता परिस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता असून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. हिंदुस्थानात मात्र कोरोनाबाधितांच्या संख्यत झपाट्याने वाढ होत आहे. तर इटली, स्पेन आणि फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून मोठ्या प्रमाणात कोरोनामुळे बळी गेले आहेत. अमेरिकेत आता जुलै महिन्याच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी होत आहे. चाचण्यांची संख्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटल्याते तज्ज्ञ सांगत आहेत. मात्र, जुलै महिन्याच्या तुलनेत पाच देशांमध्ये रुग्णसंख्या घटल्याचे दिसून येत असल्याने दिलासा मिळाला आहे. तर काही देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने चिंता वाढली आहे.
अमेरिकेत जून आणि जुलै महिन्यात कोरोनाने थैमान घातले होते. अमेरिकेतील आकडेवारीनुसार आता रुग्णसंख्येत घट होत आहे. अमेरिकेत 22 जुलैला सर्वाधिक 68,634 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर आता दररोज 40 हजार रुग्ण आढळत आहेत. असे असले तरी कोरोनाबाधितांच्या संख्येत अमेरिका आजही पहिल्या स्थानावर असून 60 लाख नागरिक कोरोनाबाधित आहेत. तर 1 लाख 77 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आता रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर आहे. या देशात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होत आहे. दक्षिणआफ्रिकेत 15 जुलैला सर्वाधिक 12,341 कोरोनाबाधित आढळले होते. तर आता सरासरी 3,342 रुग्ण आढळत आहे. त्यामुळे या देशालाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
रशियातही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. रशियाने आता कोरोनाची लस आणल्यानेही तेथे रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मे महिन्यानंत 22 ऑगस्टला पहिल्यांदा दिवसाची रुग्णसंख्या 5 हजाराच्या खाली आली आहे. रशियात जुलै महिन्यात दररोज 6500 कोरोनाबाधित आढळत होते. ती संख्या आता 5300 वर आली आहे. सौदी अरेबियाला कोरोनाचा मोठा फटका बसाल होता. या देशात जुलै महिन्यात 3 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. जुलै महिन्यात दिवसाला सरासरी 3700 नवे रुग्ण आढळत होते. ती संख्या आता 1200 वर आली आहे. पाकिस्तानातही दररोज 5 हजार नवे रुग्ण आढळत होते. आता ते आकडा 600 पर्यंत खाली आहे. काही देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने दिलास मिळात असला तरी काही देशाता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने चिंता वाढली आहे.

























































