
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धडधडीत खोटं बोलून आरोपी पोलिसांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. माझ्या मुलाला पोलिसांनी मारले, घाटी रुग्णालयात न्यायाधीशांसमोर शवविच्छेदन केले तो रिपोर्ट खोटा आहे का? असा संतप्त सवाल सोमनाथ सूर्यवंशीची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी केला आहे.
परभणी पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर विधान भवनाच्या पटलावर खोटे बोलल्याचा आरोप केला आहे. फडणवीस माझ्या मुलाच्या मृत्युविषयी धडधडीत खोटे बोलले. त्यांचे हे बोलणे म्हणजे महाराष्ट्र व संविधानाला कलंक लावणारे आहे, असा संताप विजयाबाई सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाचे पालन करा, अशी मागणी सोमनाथच्या आईने केली आहे.