आत्महत्या केल्याचा रचला बनाव; मुलाने केला बापाचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किल्लारी

शेतकरी आत्महत्या झाल्यास राज्य सरकार मदत करते या मदतीच्या लालसेपोटी मुलानेच जन्मदात्या पित्याच्या डोक्यात दगड घालून खुन केला व नंतर प्रेत विहीरीत फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारची मदत मिळते. ती मदत मिळवण्यासाठी बापाचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. या घटनेने किल्लारी परिसरात खळबळ उडाली आहे.

किल्लारी पोलिसांनी सांगितले की, मौजे संक्राळ येथील बालाजी नामदेव माळी (३९) याने १४ सप्टेंबरला दूपारी चार वाजण्याच्या सुमारास घरी झोपलेल्या नामदेव माळी (६४) यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. रात्री पत्नीच्या मदतीने त्यांचा मृतदेह गावाशेजारील विहीरीत टाकला. घरातील रक्त शेणाने सारवून टाकले व माझ्या बापाने कर्जास कंटाळून आत्महत्या केली आहे असा बनाव रचला. शवविच्छेदनात डोक्यात गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला हिसका दाखवताच आपणच पत्नीच्या मदतीने खून केल्याची कबुली त्याने दिली. बालाजी माळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.