जमिनीवर डोके आपटून मुलाने केली आईची निर्घृण हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना प्रतिनिधी । भाईंदर

भाईंदर मध्ये राहणाऱ्या एका 45 वर्षीय मुलाने भांडणातून आपल्या 70 वर्षीय आईचे डोके जमिनीवर आपटून हत्या केlली  आहे.  पोलिसांनी याप्रकरणी  मुलाला अटक केली आहे.

भाईंदर पश्चिम भागातील मांडवी तलाव परिसरातील प्रतीक्षा इमारतीत सोमनाथ मित्र व त्याची आई रमा मित्र हे दोघेजण भाडे तत्वावर गेले दीड वर्ष राहत होते. त्यांच्यात घरगूती वादातून नेहमीच भांडणे होत असत. भाईंदर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी त्या दोघांत भांडण सुरू झाल्याचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला होता. त्यानंतर जोरजोरात भांडणाचा आवाज आला. घराचे दार बंद असलेतरी आत मध्ये मुलगा आईला मारत असल्याचा तसेच आईचा ओरडण्याचा आवाज येत असल्याचा अंदाज शेजाऱ्यांना आला होता.

काही वेळाने आवाज थांबला असला तरी आतमध्ये काहीतरी विपरीत घडले असण्याची शंका शेजाऱ्यांना आली. त्यामुळे त्यांनी घराला बाहेरून कडी लावून घेतली आणि पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कडी उघडून आत प्रवेश केला आणि त्यांना धक्कादायक प्रकार समोर दिसला. सोमनाथ याने आपली आई रमा हिचे डोके जमिनीवर आपटून तिचा खून केला होता. रमा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर सोमनाथ शांतपणे समोर बसून होता. पोलिसांनी सोमनाथला अटक केली असून रमाचा मृतदेह शवविच्छेदन साठी पाठविला आहे. भाईंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव पुढील तपास करत आहेत.